अलिबाग (अमुलकुमार जैन): बहुप्रतीक्षित व रेल्वे प्रवाशांसाठी मृत्वपूर्ण ठरला जाणाऱ्या नवीन कर्जत-पनवेल उपनगरी रेल्वे मार्गाचे काम हे अंतिम टप्प्यात आले असून, या नवीन उपनगरीय रेल्वे मार्गावरील पनवेल, चिखले, पोएंजे, चौक आणि कर्जत स्थानक परिसरासह या मार्गावरील बोगदे व विविध विकासकामांची पाहणी दौरा हा मंगळवार दि. २६ मे २०२६ रोजी मावळ लोकसभा मतदार संघाचे खासदार श्रीरंग बारंगे यांनी केला या दौऱ्यामध्ये कर्जत – खालापूर विधानसभा मतदार संघाचे आमदार महेंद्र थोरवे, रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी व स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी तीन महिन्यात या मार्गावर लोकल धावणार असल्याचे खासदार श्रीरंग बारंगे यांनी सांगितले. तसेच सुमारे १५ प्लॅटफॉर्म असलेले आधुनिक कर्जत रेल्वे स्थानक उभारले जाणार असल्याने, जुने आणि नवे रेल्वे स्थानक जोडण्यासाठी विशेष मार्गिका ही तयार केली जाणार असल्याचे सांगत, चारफाटा परिसरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी रस्ते रुंदीकरण आणि एम एस आर डी सी यांच्या समन्वयातून वाहतूक नियोजन करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, पत्रकारांनी कर्जत स्थानकावरून अनेक मेल-एक्स्प्रेस गाड्यांचे थांबे बंद करण्यात आले. तसेच रेल्वे प्रवासी संघटने कडून सह्यांचे राबविण्यात आलेले महाअभियान असे मुद्दे उपस्थित केले असता, खासदार श्रीरंग बारणे यांच्याकडून रेल्वे प्रशासनाने अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी आणि जलद गाड्यांचा वेग वाढवण्यासाठी काही ठिकाणचे थांबे रद्द केल्याचे सांगण्यात आले.
मात्र खासदार श्रीरंग बारणे यांनी नवीन पनवेल–कर्जत रेल्वे मार्गाची पाहणी केली. मात्र या दौऱ्याबाबत रेल्वे पॅसेंजर असोसिएशन तसेच सर्वसामान्य प्रवाशांना अधिकृत वेळ व स्थळाची कोणतीही पूर्वकल्पना देण्यात आली नसल्याने सोशल मीडियावर तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
काही सोशल मीडिया ग्रुपवर केवळ अर्धा तास अगोदर “दोन वाजता खासदार येणार” असा संदेश प्रसारित करण्यात आला. मात्र नेमके ठिकाण नमूद नसल्याने सामान्य प्रवासी व नागरिकांना अचानक उपस्थित राहणे अशक्य झाले. त्यामुळे पुन्हा एकदा “मोजक्या आणि मर्जीतील लोकांनाच माहिती दिली जाते” अशी चर्चा रंगू लागली आहे.
नवीन रेल्वे मार्ग व सुविधा या नक्कीच स्वागतार्ह असल्याचे नागरिक सांगत असले, तरी गेल्या सहा वर्षांपासून पाच गाड्या बंद करण्यात आल्या असून अनेक महत्त्वाच्या गाड्यांचे थांबे रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळे “प्रवाशांसाठी स्टेशनचा उपयोग तरी काय?” असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
खासदार बारणे यांनी “मी संसदेत विषय मांडतो, पाठपुरावा करतो; पण रेल्वे प्रशासन ऐकत नाही. त्यासाठी जनरेटा हवा,” असे म्हटल्याची चर्चा आहे. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून निवेदने, मंत्री–खासदारांच्या भेटी, डी आर एम – डी एम कार्यालयातील पाठपुरावा, रेल्वे पॅसेंजर असोसिएशनच्या सह्यांच्या मोहिमा यानंतरही अपेक्षित निर्णय होत नसल्याने “जनरेटा म्हणजे नेमके काय?” असा प्रश्न प्रवासी विचारत आहेत.
प्रवासी व स्थानिक नागरिकांनी खासदारांनी स्वतः पुढाकार घेऊन आंदोलनाचे नेतृत्व करावे, संसदेत प्रश्न न सुटल्यास रस्त्यावर उतरावे, अशी मागणी केली आहे. तसेच रद्द झालेल्या गाड्या व बंद थांबे पुन्हा सुरू करण्याबाबत स्पष्ट कालमर्यादा देता येत नसेल, तर नैतिक जबाबदारी स्वीकारावी, अशी भावना सोशल मीडियावर व्यक्त होत आहे.
दरम्यान, काही नागरिकांनी खासदार तटकरे यांनी रोहा मार्गासाठी आठ गाड्यांचे थांबे मंजूर करून घेतल्याचा उल्लेख करत कर्जत–खालापूर परिसरासाठी ठोस प्रयत्नांची अपेक्षा व्यक्त केली आहे.
*************
कर्जतच्या जुन्या रेल्वे स्थानकातील मूलभूत समस्या या गंभीर प्रश्नांकडे अनेक वर्षे दुर्लक्ष करण्यात आले. अनेक प्रवासी संघटनांनी वारंवार निवेदने देऊनही खासदारांनी जुन्या स्थानकाची स्वतंत्र पाहणी केली नाही. आता नव्या स्थानकाचे काम प्रगतिपथावर असताना केलेला हा दौरा केवळ प्रसिद्धीचा भाग आहे.
:- प्रभाकर गंगावणे, सचिव, कर्जत रेल्वे पॅसेंजर
असोसिएशन,





