डॉक्टर हल्ल्याबाबत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांनी काळी फित लावून केला निषेध


अलिबाग (प्रतिनिधी) : कल्याण – डोंबिवलीतील महापालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात शिंदे सेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी रुग्णालयातील डॉ. वैभव साळुंखे यांना मारहाण केल्याची घटना घडली आहे. डॉक्टरांच्या बचावासाठी आलेल्या परिचारिका यांनाही धक्काबुक्की करण्यात आली आहे. डॉक्टर आणि परिचारिकेवर केलेल्या या हल्ल्याच्या निषेधार्ध अलिबागमधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील वैद्यकीय शिक्षक संघटना आणि मार्टच्या डॉक्टरांनी काळी फीत लावून निषेध केला. हल्लेखोरांवर कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे. महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. पूर्वा पाटील आणि जिल्हाधिकारी किशन जावळे यांना संघटनेमार्फत निवेदन दिले आहे.

रुग्णाचे प्राण वाचविण्यासाठी डॉक्टर, परिचारिका आरोग्य यंत्रणा अहोरात्र सेवा देत असतात. मात्र अनेकदा डॉक्टरांवर रुग्णाच्या नातेवाईकांकडून हल्ले होण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. त्यामुळे डॉक्टर, परिचारिका यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. डॉक्टरांवर होणाऱ्या हल्ल्याची जबाबदारी शासनाची आहे. मात्र शासन ही जबाबदारी झटकताना दिसत आहेत. सत्ताधारी पक्षातील लोकप्रतिनिधीच हल्लेखोर झाले आहेत.

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका यांना शिंदेसेनेच्या नगरसेवकांकडून मारहाण झाली आहे. या घटनेबाबत आरोपी रमेश म्हात्रे यांच्याविरोधात गुन्हा दाखल होऊन त्यांना अटक ही झाली आहे. मारहाणीचा निषेध व्यक्त करीत अलिबाग मधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील शिक्षक डॉक्टरांनी काळी फित लावून निषेध व्यक्त केला आहे. रुग्णालयातील कामे सुरू ठेवून डॉक्टरांनी निषेध व्यक्त केला आहे.

डॉक्टर व परिचारिका यांच्यावर केलेल्या भ्याड हल्ल्याबाबत डॉक्टरांनी महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ पूर्वा पाटील, जिल्हाधिकारी किशन जावळे यांना दोषींवर तत्काळ व कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे. रुग्णालय तसेच महाविद्यालयात प्रभावी सुरक्षा व्यवस्था, प्रशिक्षित सुरक्षा कर्मचारी, सीसीटीव्ही, प्रवेश नियंत्रण प्रणाली, तातडीची प्रतिसाद यंत्रणा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.
**********
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अलिबाग मधील सर्व डॉक्टर कडून घडलेल्या प्रकाराचा निषेध करीत आहोत. काळी फीत लावून आरोग्य सेवा देत आहोत. दोषींवर कठोरात कठोर कारवाई व्हावी अशी मागणी आमची आहे.

डॉ. करण वाघमारे, जनरल सेक्रेटरी, डॉक्टर शिक्षक संघटना