अलिबाग (प्रतिनिधी): अलिबाग जिल्हा सामान्य रुग्णालयातील पी.एम.सी., के.एम.सी. वॉर्ड तसेच शस्त्रक्रिया विभाग पेण किंवा पनवेल येथे स्थलांतरित करण्याचा प्रस्ताव असल्याच्या पार्श्वभूमीवर अलिबाग नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा अक्षया नमिता प्रशांत नाईक यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांना निवेदन देत या निर्णयाला तीव्र विरोध दर्शविला आहे. धोकादायक ठरलेल्या इमारतीतील हे विभाग सुरक्षित इमारतीत तात्पुरते हलवावेत, मात्र अलिबागबाहेर स्थलांतर करू नये, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली आहे.
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अहवालानुसार रुग्णालयाच्या जुन्या इमारतीतील दुसऱ्या मजल्यावरील शस्त्रक्रिया विभाग तसेच पी.एम.सी. आणि के.एम.सी. वॉर्ड धोकादायक घोषित करण्यात आले आहेत. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांचे तात्पुरते स्थलांतर आवश्यक असल्यास त्याला विरोध नसल्याचे नगराध्यक्षांनी स्पष्ट केले आहे. मात्र हे विभाग पेण किंवा पनवेल येथे हलविणे सर्वसामान्य रुग्णांच्या हिताविरुद्ध असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
अलिबाग जिल्हा सामान्य रुग्णालय हे रायगड जिल्ह्यातील अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन, म्हसळा, तळा, रोहा तसेच किनारपट्टी आणि ग्रामीण भागातील नागरिकांसाठी प्रमुख शासकीय आरोग्यसेवा केंद्र आहे. दररोज शेकडो रुग्ण उपचारासाठी येथे येत असतात. अशा परिस्थितीत महत्त्वाचे विभाग इतर शहरात हलवल्यास गरीब, ज्येष्ठ नागरिक, महिला आणि गंभीर रुग्णांना मोठा प्रवास करावा लागेल. त्यामुळे आर्थिक भार वाढण्याबरोबरच उपचारांमध्ये विलंब होण्याची शक्यता असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
नगराध्यक्ष नाईक यांनी संबंधित विभागांचे स्थलांतर अलिबाग जिल्हा रुग्णालयाच्या परिसरातील सुरक्षित इमारतीत तातडीने करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे रुग्णांची आरोग्यसेवा अखंडित राहील आणि कोणतीही गैरसोय होणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
याशिवाय, सर्वसामान्य नागरिकांच्या हिताचा विचार करून प्रशासनाने हा निर्णय तातडीने घ्यावा, अन्यथा नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याची वेळ येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी रायगड आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद रायगड यांनाही पाठविण्यात आल्या आहेत.
Home ताज्या बातम्या अलिबाग जिल्हा रुग्णालयातील पीएमसी, केएमसी वॉर्ड आणि शस्त्रक्रिया विभाग पेण किंवा पनवेलला...






