जंतरमंतर आंदोलनात केंद्र सरकारवर टीकेची झोड; मागण्या मान्य होण्याबाबत सकारात्मक संकेत


नवी दिल्ली (प्रतिनिधी) : जंतरमंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान आंदोलकांच्या प्रतिनिधींची झालेल्या बैठकीची माहिती नंतर आंदोलनाचे प्रमुख कार्यकर्ते सौरव दास यांनी उपस्थित आंदोलकांना जाहीरपणे दिली. बैठकीत झालेल्या चर्चेचा आढावा देताना त्यांनी सरकारकडून काही सकारात्मक संकेत मिळत असून, आंदोलनकर्त्यांच्या मागण्या मान्य होण्याच्या दृष्टीने अनुकूल घडामोडी सुरू असल्याचे सांगितले. त्यामुळे आंदोलनकर्त्यांमध्ये आशावादाचे वातावरण निर्माण झाले.

यावेळी आंदोलकांनी आपल्या विविध मागण्यांवर ठाम भूमिका कायम ठेवत न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असा निर्धार व्यक्त केला. सरकारने लवकरात लवकर ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणीही आंदोलकांकडून करण्यात आली.

दरम्यान, आंदोलनादरम्यान अभिजित दीपके यांनी केंद्र सरकारवर टीका करत केंद्रीय शिक्षणमंत्री धरमेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तातडीने राजीनामा द्यावा, अशी मागणी केली. तसे न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल आणि आंदोलकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजीनाम्याचीही मागणी करावी लागेल, असा इशारा त्यांनी दिला.

अभिजित दीपके यांच्या या वक्तव्याला उपस्थित आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत प्रतिसाद दिला. आंदोलनाच्या ठिकाणी वातावरण काही काळ चांगलेच तापले होते. आंदोलनकर्त्यांनी आपल्या मागण्या पूर्ण होईपर्यंत संघर्ष सुरू ठेवण्याचा निर्धार पुन्हा एकदा व्यक्त केला.