
अलिबाग (प्रतिनिधी) : रायगड जिल्हा तलाठी संघाने आपल्या सहकाऱ्यावर कोणतीही प्राथमिक चौकशी न करता करण्यात आलेल्या कारवाईच्या निषेधार्थ कामबंद आंदोलनात सहभाग घेतला. या कारवाईबाबत तलाठी संघाने तीव्र नाराजी व्यक्त करत संबंधित प्रकरणात न्याय्य आणि कायदेशीर प्रक्रिया राबविण्याची मागणी केली आहे.
संघाच्या निवेदनानुसार, शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी कामात हलगर्जीपणा करीत असल्यास त्याच्याविरोधात नियुक्त प्राधिकाऱ्याकडून महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७१ नुसार प्रशासकीय किंवा विभागीय चौकशी करून पुढील कारवाई करण्यात येते. मात्र, संबंधित प्रकरणात या नियमांची अंमलबजावणी न करता थेट कारवाई करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
संघाने पुढे म्हटले आहे की, ज्या गुन्ह्यात कमाल सात वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद आहे, अशा प्रकरणांमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार संबंधित व्यक्तीला थेट अटक करण्याऐवजी प्रथम नोटीस बजावणे आवश्यक असते. असे असतानाही कोणतीही पूर्वसूचना किंवा सखोल चौकशी न करता मंडळ अधिकारी जाधव यांना पोलिसांनी अटक केल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या घटनेमुळे राज्यातील महसूल कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले असून, संबंधित अधिकाऱ्यांना न्याय मिळावा आणि कायदेशीर प्रक्रियेचे पालन व्हावे, अशी मागणी रायगड जिल्हा तलाठी संघाने केली आहे. तसेच या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून अन्यायकारक कारवाई मागे घेण्याची मागणीही संघाने निवेदनाद्वारे केली आहे.






