गणरायाचे तटकरे निवासस्थानी मंगलमय आगमन; तटकरे परिवाराकडून भक्तिभावाने पूजा-अर्चा


रायगड (प्रतिनिधी): राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी गणरायाचे मंगलमय वातावरणात आगमन झाले. ढोल-ताशांचा गजर, गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात तटकरे परिवाराने गणरायाचे जल्लोषात स्वागत केले. बाप्पांची विधिवत प्रतिष्ठापना झाल्यानंतर तटकरे कुटुंबीयांनी भक्तिभावाने पूजा-अर्चा आणि आरती केली.

गणराय मखरात विराजमान झाल्यानंतर खासदार सुनील तटकरे, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह तटकरे परिवारातील सदस्यांनी बाप्पांचे दर्शन घेतले. पारंपरिक पद्धतीने विधिवत पूजा करून गणरायाची आरती करण्यात आली. यावेळी संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारून गेला होता.

गणपती बाप्पाच्या चरणी तटकरे परिवाराने सर्वांच्या सुख, शांती, समृद्धी आणि उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना केली. तसेच राज्यातील नागरिकांसह सर्वांच्या जीवनात आनंद, समाधान आणि भरभराट नांदो, अशी मनोभावे प्रार्थना करण्यात आली.

गणेशोत्सवाच्या निमित्ताने तटकरे निवासस्थानी उत्साहाचे आणि भक्तिभावाचे वातावरण पाहायला मिळाले. गणरायाच्या जयजयकाराने परिसर दुमदुमून गेला. कुटुंबीयांनी मोठ्या श्रद्धेने बाप्पांचे स्वागत करत गणेशोत्सवाला सुरुवात केली.