नागोठणे उड्डाणपूल छोट्या वाहनांसाठी खुला; अवजड वाहनांना अद्याप बंदी


नागोठणे (प्रतिनिधी) : मुंबई-गोवा महामार्गावरील नागोठणे येथील उड्डाणपूल अखेर छोट्या वाहनांच्या वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव गेल्या काही दिवसांपासून हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता. त्यामुळे वाहनचालकांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागत होता. आता पुलाची पाहणी करून हलक्या वाहनांसाठी वाहतूक सुरू करण्यात आली आहे.
उड्डाणपूल खुला झाल्याने नागोठणे परिसरातून मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करणाऱ्या दुचाकी, कार तसेच इतर हलक्या वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र, अवजड वाहनांना उड्डाणपुलावरून जाण्यास अद्याप परवानगी देण्यात आलेली नाही.
अवजड वाहनांना पुलावर प्रवेश करता येऊ नये, यासाठी उड्डाणपुलाच्या प्रवेशद्वारावर गर्‍डर बसवण्यात आले आहेत. त्यामुळे ट्रक, कंटेनर तसेच अन्य जड वाहनांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागणार आहे. पुलाची सुरक्षितता आणि वाहतुकीच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना पूर्ण झाल्यानंतरच अवजड वाहनांना प्रवेश देण्याबाबत निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.
दरम्यान, उड्डाणपूल छोट्या वाहनांसाठी खुला झाल्याने महामार्गावरील वाहतूक काही प्रमाणात सुरळीत होण्यास मदत होणार आहे. मात्र, अवजड वाहनांवरील बंदी किती काळ कायम राहणार, याबाबत वाहनचालकांमध्ये उत्सुकता आहे. संबंधित यंत्रणेकडून याबाबत स्पष्ट सूचना देण्याची मागणीही होत आहे.