नगरसेवक संदीप पालकर यांचा स्वखर्चातून स्वच्छता उपक्रम; लिमये गार्डन परिसराची केली साफसफाई
अलिबाग (प्रतिनिधी) : श्रीबाग परिसर स्वच्छ, सुंदर आणि सुरक्षित करण्याच्या उद्देशाने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अलिबाग शहरप्रमुख तथा नगरसेवक आणि विरोधी पक्षनेते संदीप पालकर यांनी स्वखर्चातून स्वच्छता उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमांतर्गत आज श्रीबाग येथील लिमये गार्डन परिसराची साफसफाई करण्यात आली.
लिमये गार्डन परिसरात मोठ्या प्रमाणात झाडेझुडपे आणि गवत वाढले होते. त्यामुळे या ठिकाणी अस्वच्छता निर्माण होण्याबरोबरच साप किंवा इतर सरपटणारे प्राणी असण्याची भीती नागरिकांमध्ये व्यक्त केली जात होती. विशेष म्हणजे, या परिसरात लहान मुले खेळण्यासाठी येत असतात. तसेच शाळकरी विद्यार्थ्यांचीही या भागातून मोठ्या प्रमाणात ये-जा सुरू असते. त्यामुळे वाढलेल्या झाडाझुडपांमुळे त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला होता.
ही बाब लक्षात घेऊन नगरसेवक संदीप पालकर यांनी कोणत्याही शासकीय निधीची वाट न पाहता स्वतःच्या खर्चातून या परिसराच्या स्वच्छतेचा पुढाकार घेतला. यावेळी परिसरातील वाढलेली झाडेझुडपे काढून स्वच्छता करण्यात आली.
श्रीबाग परिसरातील नागरिकांना स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी वातावरण मिळावे, तसेच लहान मुले आणि विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे वावरता यावे, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे संदीप पालकर यांनी सांगितले.
श्रीबागमधील केवळ एका ठिकाणापुरती स्वच्छता मर्यादित न ठेवता संपूर्ण परिसर स्वच्छ आणि सुंदर करण्याचा आमचा मानस आहे. नागरिकांच्या आरोग्याचा आणि सुरक्षिततेचा विचार करून अशा प्रकारचे उपक्रम सातत्याने राबविण्यात येतील, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
लोकप्रतिनिधींनी केवळ विकासकामांचा पाठपुरावा न करता नागरिकांच्या दैनंदिन समस्या सोडविण्यासाठी प्रत्यक्ष मैदानात उतरून काम करणे गरजेचे आहे. या भावनेतून राबविण्यात आलेल्या या स्वच्छता उपक्रमाचे श्रीबाग परिसरातील नागरिकांकडून स्वागत होत आहे.









