पीएनपी महाविद्यालयाच्या सहा खेळाडूंची चमक
अलिबाग (प्रतिनिधी): मुंबई विद्यापीठाच्या अंतरविभागीय कबड्डी स्पर्धा २०२६-२७ मध्ये कोकण विभागाच्या मुलांच्या आणि मुलींच्या दोन्ही संघांनी दमदार कामगिरी करत रौप्यपदक पटकाविले. या दोन्ही संघांमध्ये प्रभाकर पाटील एज्युकेशन सोसायटीच्या आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, वेश्वी-अलिबाग या महाविद्यालयाच्या सहा खेळाडूंचा समावेश होता. त्यामुळे महाविद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रातील यशात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
या स्पर्धेसाठी कोकण विभागाच्या मुलांच्या संघात महाविद्यालयातील नीरज मिसाळ, स्मित म्हात्रे, प्रेम कांबळे आणि निशांत म्हात्रे या चार खेळाडूंची, तर मुलींच्या संघात ऋतुजा पाटील आणि चैत्राली म्हात्रे या दोन खेळाडूंची निवड झाली होती. या सहाही खेळाडूंनी आपल्या कौशल्यपूर्ण खेळाच्या जोरावर कोकण विभागाचे प्रतिनिधित्व करत महाविद्यालयाचा नावलौकिक उंचावला.
स्पर्धेमध्ये दोन्ही संघांनी प्रतिस्पर्ध्यांना चुरशीची लढत देत जिद्द, चिकाटी, सांघिक एकजूट आणि उत्कृष्ट खेळाचे दर्शन घडविले. या उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर मुलांच्या आणि मुलींच्या अशा दोन्ही संघांनी रौप्यपदकाची कमाई केली.
या यशाबद्दल संस्थेच्या कार्यवाह चित्रलेखा पाटील, कॉलेजचे संचालक विक्रांत वार्डे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ओमकार पोटे, कार्यालयीन समन्वयक गबाजी गीते, क्रीडा प्रशिक्षक प्रा. तेजेश म्हात्रे, क्रीडा विभागप्रमुख प्रा. स्वराली ठाकूर, प्रा. हर्षल काठे, प्रा. लवेश पाटील आणि प्रा. जयश्री ठाकूर यांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील क्रीडा वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
एकाच महाविद्यालयातील सहा खेळाडूंची विद्यापीठाच्या अंतरविभागीय स्पर्धेत कोकण विभागाच्या संघात निवड होणे आणि दोन्ही संघांनी रौप्यपदक पटकाविणे ही महाविद्यालयासाठी अभिमानास्पद कामगिरी ठरली आहे.








