शेकाप प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांची प्रतिक्रिया
अलिबाग (प्रतिनिधी) : महाराष्ट्राच्या राजकारणाला एक वेगळा दर्जा आणि समृद्ध राजकीय संस्कृती आहे. मात्र, अलीकडे काही लोकप्रतिनिधींकडून करण्यात आलेली वक्तव्ये पाहता राजकीय संस्कृतीचा स्तर घसरत असल्याचे दिसून येत आहे. अशा प्रकारची वक्तव्ये अत्यंत खालच्या पातळीवरील असून, त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला गालबोट लागत आहे. याचा खेद वाटतो, अशी प्रतिक्रिया शेतकरी कामगार पक्षाच्या प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी व्यक्त केली.
खासदार सुनील तटकरे हे राज्याच्या राजकारणातील ज्येष्ठ, अनुभवी आणि जाणकार नेते आहेत. अशा व्यक्तींबद्दल इतक्या खालच्या पातळीवर जाऊन वक्तव्य करणे योग्य नाही. राजकीय मतभेद असू शकतात; मात्र मतभेद व्यक्त करताना भाषेचे भान आणि राजकीय सभ्यतेचे भान राखणे आवश्यक आहे. कालच्या वक्तव्यांमुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रायगड जिल्ह्याची आणि अलिबागची प्रतिमा मलिन झाल्याची भावना निर्माण झाली आहे, असेही त्यांनी नमूद केले.
राजकारणात नव्या तरुण पिढीने सक्रिय होणे स्वागतार्ह आहे. मात्र, राजकारण करताना विचारांची लढाई झाली पाहिजे. टीका ही एकमेकांच्या विचारांवर, भूमिका आणि धोरणांवर असावी. वैयक्तिक पातळीवर जाऊन अपमानास्पद वक्तव्ये करणे ही राजकारणाची संस्कृती असू शकत नाही.
उदय सामंत यांनीही या प्रकरणावर आपली भूमिका मांडली आहे. विविध राजकीय पक्षांमधून अशा वक्तव्यांबाबत प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. शेतकरी कामगार पक्ष अशा प्रकारच्या वक्तव्यांचा आणि राजकारणातील घसरत्या भाषिक व सांस्कृतिक स्तराचा तीव्र निषेध करीत आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात विचारांची परंपरा, परस्परांचा आदर आणि सभ्य संवाद टिकून राहणे गरजेचे आहे, असे चित्रलेखा पाटील यांनी स्पष्ट केले.









