रायगड लोकसभा मतदारसंघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) संघटना बळकटीकरणाचा निर्धार


अलिबाग-मुरुड आणि पेण-सुधागड विधानसभा मतदारसंघांची संघटनात्मक आढावा बैठक संपन्न

अलिबाग (प्रतिनिधी) : रायगड लोकसभा मतदारसंघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची संघटना अधिक मजबूत करण्यासह पक्षाचा विस्तार तळागाळापर्यंत करण्याचा निर्धार संघटनात्मक आढावा बैठकीत करण्यात आला. अलिबाग-मुरुड आणि पेण-सुधागड या दोन विधानसभा मतदारसंघांची महत्त्वपूर्ण आढावा बैठक रायगड लोकसभा संपर्कप्रमुख तथा रायगड जिल्हा संपर्कप्रमुख संजय कदम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीला रायगड जिल्ह्यातील जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, शहरप्रमुख तसेच पक्षाचे प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बैठकीत आगामी काळातील संघटनात्मक बांधणी, पक्ष विस्तार आणि कार्यकर्त्यांना सक्रिय करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. रायगड लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक विधानसभा क्षेत्रात बूथ स्तरापासून तालुका स्तरापर्यंत संघटना अधिक सक्षम करण्यावर भर देण्याच्या सूचना संजय कदम यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या.
पक्षाची विचारधारा अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्यापक सदस्य नोंदणी अभियान राबविणे, तरुणांना पक्षाशी जोडणे आणि संघटनात्मक कामाला गती देणे, याबाबत बैठकीत विशेष चर्चा झाली. प्रत्येक विभागातील रिक्त पदांवर शाखाप्रमुख आणि गटप्रमुखांच्या नियुक्त्या तातडीने पूर्ण करून शिवसैनिक व कार्यकर्त्यांना संघटनात्मक कामात सक्रिय करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

तसेच विभागनिहाय सुरू असलेल्या कामांचा नियमित आढावा घेऊन जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी तत्परतेने काम करावे, असे आवाहन करण्यात आले. संघटनात्मक जबाबदाऱ्या प्रभावीपणे पार पाडत पक्षाचा जनसंपर्क वाढविण्यावरही भर देण्यात आला.

अलिबाग, मुरुड, पेण आणि सुधागडसह संपूर्ण रायगड लोकसभा मतदारसंघात पक्ष संघटना वाढीसाठी विविध उपक्रमांचे सूक्ष्म नियोजन करण्यात येत आहे. सर्व पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी एकजुटीने काम करून पक्ष संघटना तळागाळापर्यंत पोहोचवण्याचा संकल्प या बैठकीत करण्यात आला. आगामी काळात संघटनात्मक बांधणीला गती देऊन पक्ष अधिक सक्षम करण्याच्या दिशेने प्रयत्न सुरू राहणार असल्याचे बैठकीतून स्पष्ट झाले.