जिल्हा रुग्णालयात तणाव; पत्नीला नोकरी, दोन्ही मुलांना प्रत्येकी २५ लाखांची मदत देण्याचे आश्वासन
अलिबाग (अमूलकुमार जैन): अलिबाग-रोहा राज्य मार्गावरील मल्याण फाटा येथे सरकारी रुग्णवाहिकेने दुचाकीला दिलेल्या धडकेत चिंचोटी येथील हेमंत उर्फ बबन दामोदर पाटील (वय ५२) यांचा मृत्यू झाला. शनिवारी (दि. २८ नोव्हेंबर) दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. विशेष म्हणजे, अपघातातील सरकारी रुग्णवाहिकेचे फिटनेस प्रमाणपत्र नऊ महिन्यांपूर्वीच संपले होते. तरीही ही रुग्णवाहिका रस्त्यावर कशी धावत होती, असा सवाल उपस्थित होत आहे.
हेमंत पाटील हे काम आटोपून आपल्या दुचाकीवरून अलिबाग-वावे मार्गे आंबेपूरच्या दिशेने जात होते. यावेळी रोह्याकडून अलिबागकडे येणाऱ्या शासकीय रुग्णवाहिकेने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात ते गंभीर जखमी झाले. त्यांना अलिबाग जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेनंतर चिंचोटी ग्रामस्थ आणि नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात गर्दी केली. मृताच्या कुटुंबाला आर्थिक मदत आणि पत्नीला नोकरी देण्याची मागणी करत नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. त्यामुळे रुग्णालय परिसरात तणाव निर्माण झाला. शेकापच्या ॲड. मानसी म्हात्रे आणि सामाजिक कार्यकर्ते अॅड. राकेश पाटील यांनी या मागणीसाठी पुढाकार घेतला. पोलिसांचा मोठा बंदोबस्तही तैनात करण्यात आला.
रविवारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निशिकांत पाटील आणि अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. शीतल जोशी-घुगे यांनी नातेवाईकांशी चर्चा केली. मृताच्या पत्नीला शासकीय किंवा उपजिल्हा रुग्णालयात बाह्यस्रोताद्वारे नोकरी देण्याचे, तसेच दोन्ही मुलांना प्रत्येकी २५ लाख रुपये आर्थिक मदतीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याचे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला.
दरम्यान, रुग्णवाहिका चालक मयूर रमेश पाटील याच्याविरोधात रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. फिटनेस प्रमाणपत्र संपलेल्या रुग्णवाहिकेला रस्त्यावर धावण्याची परवानगी कोणी दिली आणि या प्रकरणात जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई होणार का, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
स्थानिक आमदारांच्या भूमिकेवर मानसी म्हात्रेंची नाराजी
या प्रकरणी ॲड. मानसी म्हात्रे यांनी कर्जत-खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या माध्यमातून आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याशी संपर्क साधून घटनेची गंभीरता निदर्शनास आणून दिली. मृताच्या कुटुंबीयांना सहानुभूतीपूर्वक आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी करण्यात आली. मात्र, स्थानिक आमदारांनी या गंभीर प्रकरणाकडे लक्ष दिले नसल्याबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला









