बारामती पोटनिवडणुकीत पार्थ पवार, सुनेत्रा पवार यांनी बजावला मतदानाचा हक्क


बारामती (प्रतिनिधी) : पोटनिवडणुकीच्या मतदान प्रक्रियेला आज उत्साहपूर्ण वातावरणात सुरुवात झाली असून, विविध राजकीय नेते आणि कार्यकर्ते मतदानाचा हक्क बजावत आहेत. याच पार्श्वभूमीवर पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार यांनी काटेवाडी येथील मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला.
मतदानासाठी जाण्यापूर्वी त्यांनी बारामतीतील विद्या प्रतिष्ठान येथे भेट देत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी परिसरात काही काळ थांबून कार्यकर्त्यांशीही संवाद साधला.
दरम्यान, बारामती पोटनिवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागले असून, प्रमुख राजकीय पक्षांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात आहे. सकाळपासूनच मतदारांमध्ये उत्साह दिसून येत असून, मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
प्रशासनाच्या वतीने मतदान प्रक्रिया सुरळीत आणि शांततेत पार पडावी यासाठी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. नागरिकांनीही मोठ्या संख्येने बाहेर पडत मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन करण्यात आले आहे.