आदिशक्ती अभियानात वाडगांव ग्रामपंचायतीची राज्यस्तरीय झेप


अलिबाग (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘आदिशक्ती अभियान’ अंतर्गत ग्रुप ग्रामपंचायत वाडगांव, ता. अलिबाग यांनी उल्लेखनीय कामगिरी करत तालुका व जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक पटकावला आहे. या यशानंतर दि. ७ मे २०२६ रोजी राज्यस्तरीय समितीने वाडगांव ग्रामपंचायतीला भेट देत विविध उपक्रमांचे परीक्षण केले.
या परीक्षणासाठी कोकण विभागाच्या विभागीय उपआयुक्त सुवर्णा पवार व परिविक्षा अधिकारी ओव्हाळ यांनी ग्रामपंचायतीच्या कार्याचा आढावा घेतला. यावेळी महिला व बाल विकास अधिकारी रायगड  कुचिक, पंचायत समिती अलिबागच्या सभापती भाग्यता पाटील, गटविकास अधिकारी शर्मिला पाटील तसेच पंचायत समिती सदस्य  समाधान वार्डे उपस्थित होते.
ग्रामपंचायत वाडगांवच्या सरपंच सारिका गणेश पवार, उपसरपंच  जयेंद्र काशिनाथ भगत तसेच ग्रामपंचायत सदस्यांनी राज्यस्तरीय समितीसमोर ग्रामपंचायतीमार्फत राबविण्यात येणाऱ्या महिला सक्षमीकरण, बालकल्याण, स्वच्छता व सामाजिक विकासाशी संबंधित उपक्रमांची माहिती सादर केली.
यावेळी ग्रामपंचायत अधिकारी रिना वर्तक, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका  सुगंधा पाटील, आशा सेविका राखी घाटकर, अंगणवाडी मदतनीस  रिदिमा बोले, पोलीस पाटील, नथुराम म्हात्रे तसेच ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“सर्व ग्रामस्थांच्या आशीर्वाद व सहकार्यामुळे ग्रामपंचायतीने ही यशस्वी वाटचाल केली असून राज्यस्तरीय पुरस्कारही आपल्या ग्रामपंचायतीला मिळावा,” अशी अपेक्षा ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.