अलिबागमध्ये मिनीडोर रिक्षात महिलेची छेडछाड मद्यधुंद परप्रांतीयाला नागरिकांकडून चोप; सहान बायपास मार्गावरील घटना


अलिबाग (प्रतिनिधी): अलिबाग तालुक्यातील सहान बायपास मार्गे बेलकडे जाणाऱ्या मिनीडोर रिक्षामध्ये एका महिला प्रवाशाची छेडछाड झाल्याची धक्कादायक घटना घडली असून, या प्रकारामुळे महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. घटनेनंतर परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांकडून आरोपीवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी (दि. ८ मे) सायंकाळच्या सुमारास संबंधित महिला मिनीडोर रिक्षातून प्रवास करत होती. यावेळी मद्यधुंद अवस्थेतील एका परप्रांतीय व्यक्तीने तिच्याशी गैरवर्तन करत छेडछाड केल्याचा आरोप आहे. आरोपीने महिलेच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याने रिक्षातील इतर प्रवासीही संतप्त झाले. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित व्यक्ती पूर्णपणे मद्याच्या नशेत होता.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तत्काळ धाव घेत आरोपीला पकडले. नागरिकांनी त्याला जाब विचारत चांगलाच चोप दिला. काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, याच व्यक्तीने यापूर्वीही अन्य एका महिलेशी अशाच प्रकारे गैरवर्तन केल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे.
या घटनेमुळे सार्वजनिक वाहतुकीत महिला प्रवाशांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.  ग्रामीण व उपनगर भागातील मिनीडोर रिक्षांमध्ये महिलांच्या सुरक्षिततेसाठी अधिक कडक उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेऊन आरोपीविरोधात कठोर कारवाई करावी, तसेच सार्वजनिक वाहतुकीत महिलांच्या सुरक्षेसाठी प्रभावी उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी महिला प्रवासी व नागरिकांकडून करण्यात येत आहे.