
रायगड-अलिबाग(जिमाका) : दाखलपूर्व व प्रलंबित खटल्यांचा जलद निपटारा व्हावा तसेच सामोपचाराने वाद मिटावेत या उद्देशाने रायगड जिल्ह्यात ९ मे २०२६ रोजी राष्ट्रीय लोक अदालत आयोजित करण्यात आली होती. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष राजेंद्र द. सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या लोक अदालतीत वादपूर्व व दाखल अशी एकूण ७ हजार ७८ प्रकरणे निकाली काढण्यात आली. यामध्ये तब्बल २० कोटी ५५ लाख २० हजार ६१५ रुपयांची तडजोड करण्यात आली.
राष्ट्रीय लोक अदालतीचे उद्घाटन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश राजेंद्र द. सावंत यांच्या हस्ते झाले.
यावेळी अलिबाग येथील न्यायिक अधिकारी, वकील संघटनेचे उपाध्यक्ष अनंत पाटील, सचिव अमित देशमुख तसेच जिल्ह्यातील न्यायिक अधिकारी, वकील वर्ग आणि पक्षकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च न्यायालय, दिल्ली यांच्या निर्देशानुसार देशभरात राष्ट्रीय लोक अदालत घेण्यात आली. रायगड जिल्ह्यात या लोक अदालतीसाठी २५ हजार ६८१ वादपूर्व आणि १२ हजार १९४ प्रलंबित अशी एकूण ३७ हजार ८७५ प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी ४ हजार ५९ वादपूर्व आणि ३ हजार १९ प्रलंबित प्रकरणे सामंजस्याने मिटविण्यात यश आले आहे, अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा दिवाणी न्यायाधीश व स्तर श्रीमती तेजस्विनी म. निराळे यांनी दिली.
एक जोडप्याचा संसार पुन्हा जुळला
लोक अदालतीदरम्यान पाली येथील एका जोडप्याचा कौटुंबिक वाद मिटून त्यांचा संसार पुन्हा सुरळीत झाला. प्रमुख जिल्हा न्यायाधीश राजेंद्र सावंत यांनी या जोडप्याचे अभिनंदन केले.
२१ मोटार अपघात प्रकरणांत २.२८ कोटींची नुकसानभरपाई मंजूर
दरम्यान, जिल्ह्यातील २१ मोटार अपघात प्रकरणांत तडजोड होऊन संबंधित पक्षकारांना २ कोटी २८ लाख ६२ हजार रुपयांची नुकसानभरपाई मंजूर करण्यात आली.
लोक अदालतीसाठी जिल्ह्यातील विविध न्यायालयांमध्ये २७ कक्ष स्थापन करण्यात आले होते. काही प्रकरणांमध्ये पक्षकारांना न्यायालयात प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची सक्ती न करता व्हिडीओ कॉलद्वारेही सुनावणी घेऊन प्रकरणे निकाली काढण्यात आली.
या उपक्रमाला अलिबाग वकील संघटना तसेच जिल्ह्यातील सर्व तालुका वकील संघटनांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. लोक अदालतीच्या यशस्वी आयोजनासाठी न्यायिक अधिकारी, वकील, न्यायालयीन कर्मचारी, जिल्हा परिषद, रायगड पोलीस प्रशासन आणि सर्व पक्षकारांचे सहकार्य लाभल्याबद्दल प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश राजेंद्र सावंत यांनी आभार मानले.





