पिंपरी-चिंचवड (श्रावणी कामत): काव्यमित्र संस्थेच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज जयंती, कवी ग्रेस स्मृतिदिन आणि डॉ. ना. य. डोळे यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या भव्य साहित्यिक सोहळ्यात विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव करण्यात आला. यावेळी कवी संजय होणकलस यांच्या “आनंदाचा बटवा” या काव्यसंग्रहाचे तसेच बापू केंगले लिखित “आय एम द बेस्ट” या कादंबरीचे प्रकाशन चिंचवड येथील सायन्स पार्क तारांगण सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले.
दरवर्षीप्रमाणे यंदाही काव्यमित्र संस्थेच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तिमत्त्वांना राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. पत्रकारितेतील उल्लेखनीय योगदानाबद्दल पिंपरी-चिंचवड पत्रकार संघाचे अध्यक्ष तथा पत्रकार सागर गोपाळ सूर्यवंशी यांना “राष्ट्रीय युवाचेतना पुरस्कार” प्रदान करण्यात आला. याशिवाय ह.भ.प. डॉ. पुष्कर महाराज गोसावी आणि संभाजीनगरचे आरटीओ निरीक्षक किरण बनसोडे यांनाही या पुरस्काराने गौरविण्यात आले.
तसेच उत्तम माने आणि प्रकाश गायकवाड यांना “कवी ग्रेस स्मृती पुरस्कार”, तर शिवाजी नायकवडी, पुष्पक कांदळकर, डॉ. वंदना पाटील आणि सुनील कांबळे यांना “डॉ. ना. य. डोळे स्मृती पुरस्कार” प्रदान करण्यात आले.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर मनोगत व्यक्त करताना संत एकनाथ महाराजांचे वंशज ह.भ.प. डॉ. पुष्कर महाराज गोसावी म्हणाले की, “साहित्य निर्मितीतून समाज परिवर्तनाची प्रक्रिया अधिक प्रभावीपणे घडू शकते. साहित्य हे समाजप्रबोधनाचे प्रभावी माध्यम आहे.”
या कार्यक्रमास सेवाभावी उद्योजक डॉ. विजयकुमार पाटील, महात्मा गांधी महाविद्यालय अहमदपूरचे प्राचार्य डॉ. व्ही. पी. पवार, प्रसिद्ध हस्तलिखितकार अजितकुमार जमदाडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाला लेखक, कवी, पत्रकार, उद्योजक, प्रशासकीय अधिकारी, शिक्षकवर्ग, साहित्यप्रेमी नागरिक तसेच पुरस्कारार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात अंध कवी शुभम नरवडे आणि अंकिता कसबे यांनी देशभक्तीपर तसेच आई-वडिलांवरील कविता सादर करून उपस्थितांची मने जिंकली. यावेळी निमंत्रित कवींनाही सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते संत तुकाराम महाराजांच्या गाथा आणि भारतीय संविधान या ग्रंथांचे पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे आयोजन काव्यमित्र संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र सगर, उपाध्यक्ष डॉ. संजय जगताप, सचिव हरिनाथ कांबळे, पुणे जिल्हा समन्वयक संभाजी दंतराव, मराठवाडा समन्वयक तुकाराम गुंठे तसेच संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी केले होते.
कार्यक्रमास प्रसिद्ध कवी किरण तारळेकर, गरूडझेप फाउंडेशनचे गणेश गरुड, व्याख्याते राहुल चव्हाण, डिजिटल मीडिया परिषद पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष विनय सोनवणे, उपाध्यक्ष पत्रकार संतोष गोतावळे, माजी अध्यक्ष पत्रकार महावीर जाधव, पत्रकार विजय न्यायाधीश यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षीय मनोगत ज्येष्ठ साहित्यिक शिवाजी भापकर यांनी व्यक्त केले. सूत्रसंचालन सुप्रिया जोगदंड यांनी केले तर आभार प्रदर्शन राजेंद्र सगर यांनी मानले.
Home ताज्या बातम्या विविध पुरस्कारांनी मान्यवरांचा गौरव; “आनंदाचा बटवा” काव्यसंग्रह व “आय एम द बेस्ट”...





