पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाचे माजी आमदार पंडितशेठ पाटील यांच्याकडून स्वागत


अलिबाग (प्रतिनिधी) : देशाच्या आर्थिक स्वावलंबनासाठी आणि आयात कमी करण्याच्या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना केलेल्या विविध आवाहनांचे माजी आमदार पंडितशेठ पाटील यांनी स्वागत करत त्यांचे आभार मानले आहेत. देशहितासाठी घेतलेल्या निर्णयांना नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद देण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करणे, परदेशी उत्पादनांऐवजी स्वदेशी वस्तूंना प्राधान्य देणे, नैसर्गिक शेतीला चालना देणे तसेच एक वर्ष सोने खरेदी टाळण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. यामुळे देशातील परकीय चलनाची बचत होऊन अर्थव्यवस्था अधिक मजबूत होण्यास मदत मिळेल, असे पंडितशेठ पाटील यांनी सांगितले.
तसेच, स्वदेशी उद्योगांना प्रोत्साहन मिळाल्यास स्थानिक उत्पादन वाढून रोजगारनिर्मितीलाही चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. देश आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि आत्मनिर्भर बनवण्यासाठी प्रत्येक नागरिकाने जबाबदारीने योगदान देणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले आवाहन हे देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचे सांगत त्यांनी केंद्र सरकारचे अभिनंदन केले.