इंधन बचतीसाठी नागरिकांनाही सहभागाचे आवाहन; ‘वर्क फ्रॉम होम’ आणि सार्वजनिक वाहतुकीवर भर


अलिबाग (प्रतिनिधी) : आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीमुळे जागतिक स्तरावर इंधन पुरवठ्यावर परिणाम होत असून त्याची झळ भारतालाही बसू लागली आहे. इंधन तुटवड्याची शक्यता लक्षात घेता राज्य सरकारकडून इंधन बचतीसाठी विविध उपाययोजना राबवण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर मंत्री अदिती तटकरे यांनी नागरिकांनाही या मोहिमेत सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले आहे.
“सर्व नागरिकांनी शक्यतो ‘वर्क फ्रॉम होम’ला प्राधान्य द्यावे. खाजगी वाहनांचा वापर कमी करून सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा अधिकाधिक वापर करावा. इंधनाची जास्तीत जास्त बचत करून सशक्त भारत घडवण्यासाठी प्रत्येकाने हातभार लावणे गरजेचे आहे,” असे आवाहन अदिती तटकरे यांनी केले.
सध्याच्या आव्हानात्मक परिस्थितीत नागरिकांनी संयम आणि जबाबदारीची भूमिका घेतली पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले. इंधन बचतीसाठी शासनाकडून जनजागृती मोहीम राबवली जात असून शासकीय कार्यालये, उद्योग क्षेत्र तसेच सर्वसामान्य नागरिकांनीही या मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
देशासमोरील या परिस्थितीचा एकजुटीने सामना करून संसाधनांचा योग्य वापर करणे ही काळाची गरज असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.