रायगड जिल्हा परिषदेत प्रतिनियुक्तीचा मुद्दा ऐरणीवर


वर्षानुवर्षे मूळ ठिकाणी सेवा नाही; कर्मचाऱ्यांना तातडीने परत बोलावण्याचे निर्देश

रायगड (प्रतिनिधी): मंगेश वाकडीकर यांनी जिल्हा परिषद प्रशासनातील प्रतिनियुक्तीच्या मुद्द्यावर कठोर भूमिका घेतली आहे. जिल्हा परिषदेत काही कर्मचारी वर्षानुवर्षे प्रतिनियुक्तीवर कार्यरत असून त्यांनी मूळ नियुक्तीच्या ठिकाणी कधीच सेवा दिलेली नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे. तरीही संबंधित कर्मचारी नियमित वेतन घेत असल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
या पार्श्वभूमीवर अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी प्रशासनाला अशा सर्व कर्मचाऱ्यांची माहिती तातडीने सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच जे कर्मचारी दीर्घकाळ प्रतिनियुक्तीवर आहेत, त्यांना त्यांच्या मूळ नियुक्तीच्या ठिकाणी त्वरित परत पाठविण्याची कार्यवाही करण्यास सांगितले आहे.
जिल्हा परिषद प्रशासन अधिक पारदर्शक आणि शिस्तबद्ध करण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. अनेक विभागांमध्ये मनुष्यबळाची कमतरता जाणवत असताना काही कर्मचारी मूळ ठिकाणी अनुपस्थित राहणे ही गंभीर समस्या असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील कामकाजावरही परिणाम होत असल्याची चर्चा आहे.
या निर्णयामुळे प्रशासनात खळबळ उडाली असून, प्रतिनियुक्तीच्या नावाखाली सुरू असलेल्या अनियमिततेवर आळा बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.