रायगड (प्रतिनिधी): काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी आदरणीय राजाभाऊ ठाकूर यांची निवड झाल्याने जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. पक्षश्रेष्ठींनी घेतलेल्या या निर्णयाचे जिल्हाभरातून स्वागत होत असून, विविध स्तरांतून अभिनंदन आणि आभार व्यक्त केले जात आहेत.
राजाभाऊ ठाकूर यांच्या निवडीमुळे काँग्रेस पक्षाला नवसंजीवनी मिळेल, असा विश्वास कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे. स्वर्गीय ए. आर. अंतुले साहेब तसेच कैलासवासी आदरणीय मधुशेठ ठाकूर उर्फ पप्पा यांनी जपलेली विचारधारा गावोगावी, तालुक्यात आणि शहरांमध्ये पोहोचवण्याचे कार्य राजाभाऊ ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली अधिक प्रभावीपणे घडेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
माजी आमदारांचे सुपुत्र असूनही सर्वसामान्य कार्यकर्ते आणि गोरगरिबांमध्ये मिसळून राहणारा नेता म्हणून राजाभाऊ ठाकूर यांची ओळख आहे. कोणत्याही अडचणीच्या वेळी कार्यकर्त्यांच्या मदतीला धावून जाणारा, सर्वांना सोबत घेऊन चालणारा आणि संघटन कौशल्य असलेला नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.
त्यांच्या नेतृत्वगुणांमुळे काँग्रेस पक्षाला एक बुद्धिमान, अभ्यासू आणि कार्यक्षम जिल्हाध्यक्ष लाभल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे. आगामी काळात पक्षवाढीसाठी मोठ्या प्रमाणात काम करून जिल्ह्यात काँग्रेसचे पुन्हा चैतन्य निर्माण करण्यासाठी राजाभाऊ ठाकूर यांचे नेतृत्व महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
राजाभाऊ ठाकूर यांनी दक्षिण जिल्हाध्यक्षपदाची धुरा स्वीकारल्याबद्दल सर्व स्तरांतून त्यांचे अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या पुढील राजकीय आणि सामाजिक वाटचालीस शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.





