खासगी सचिव राजेश गायकवाडवर रोहिणी खडसेंचे गंभीर आरोप
मंत्री अदिती तटकरेंचा गायकवाडवर वरदहस्त आहे का ? रोहिणी खडसेंचा सवाल
मुंबई (प्रतिनिधी): महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांचे खासगी सचिव राजेश गायकवाड यांच्यावर महिला अधिकाऱ्यांना धमक्या देणे, शिवराळ भाषेचा वापर करणे आणि बदल्यांचे रॅकेट चालवण्याचे गंभीर आरोप समोर आल्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. या प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी संतप्त प्रतिक्रिया देत मंत्री अदिती तटकरे यांच्यावर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
रोहिणी खडसे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, जळगाव जिल्हा महिला व बालविकास अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे लेखी तक्रार केली असून राजेश गायकवाड महिला अधिकाऱ्यांशी अशोभनीय भाषेत बोलतात, नोकरीवरून काढून टाकण्याच्या धमक्या देतात तसेच मोठ्या रकमा घेऊन बदल्यांचे रॅकेट चालवत असल्याचे आरोप आहेत. महिला व बालविकाससारख्या संवेदनशील विभागात असे प्रकार घडत असतील तर ते अत्यंत धक्कादायक आणि निंदनीय आहे. मंत्री अदिती तटकरे यांचा गायकवाड यांच्यावर वरदहस्त आहे का? काही आर्थिक लागेबांधे आहेत का? याची उत्तरे जनतेला मिळाली पाहिजेत, असा सवाल रोहिणी खडसे यांनी उपस्थित केला आहे.
या सर्व आरोपांवर राजेश गायकवाड यांनी प्रतिक्रिया देत तक्रारी पूर्णपणे निराधार आणि चुकीच्या उद्देशाने प्रेरित असल्याचा दावा केला आहे. विभागातील काही प्रशासकीय आणि धोरणात्मक बदल्यांनंतर वैयक्तिक हितसंबंध दुखावल्यामुळे जाणीवपूर्वक खोट्या तक्रारी करण्यात येत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.





