घाटमाथ्यांवरील धोकादायक वळणांवर क्रॅश बॅरियर बसविण्याच्या सूचना


रायगड (प्रतिनिधी): रायगड जिल्ह्यातील घाटमाथ्यांवरील धोकादायक व अपघातप्रवण वळणांवर तातडीने क्रॅश बॅरियर बसविण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम विभाग, एमएसआरडीसी आणि महामार्ग विभागाला देण्यात आल्या असल्याची माहिती रायगड वाहतूक शाखेच्या पोलीस निरीक्षक सुजाता चव्हाण यांनी दिली. वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या आढावा बैठकीत घाटरस्त्यांवरील सुरक्षेचा प्रश्न गांभीर्याने मांडण्यात आला होता. विशेषत तीव्र वळणे, खोल दऱ्यांच्या कडेला असलेले रस्ते आणि पावसाळ्यात धोकादायक ठरणारे घाटमार्ग याठिकाणी संरक्षणात्मक उपाययोजना करण्याचे निर्देश संबंधित विभागांना देण्यात आले आहेत.
वाहनचालकांचा वेग नियंत्रणात राहावा तसेच वाहन दरीत कोसळण्यासारख्या गंभीर दुर्घटना टाळता याव्यात, यासाठी मजबूत क्रॅश बॅरियर उभारण्यावर भर देण्यात येणार आहे. यासोबतच रस्त्यांवरील चेतावणी फलक, रिफ्लेक्टर, स्पीड लिमिट बोर्ड आणि धोकादायक वळणांची स्पष्ट चिन्हे लावण्याच्याही सूचना देण्यात आल्या आहेत.
पावसाळ्याच्या काळात घाटरस्त्यांवर अपघातांचे प्रमाण वाढत असल्याने प्रशासनाने ही मोहीम प्राधान्याने हाती घेतली आहे. संबंधित विभागांनी प्रत्यक्ष पाहणी करून तातडीने काम सुरू करावे, असे निर्देश बैठकीत देण्यात आल्याचे सुजाता चव्हाण यांनी सांगितले.
वाहतूक शाखेकडूनही नागरिकांना सुरक्षित वाहनचालना करण्याचे आवाहन करण्यात आले असून, घाटरस्त्यांवर वेग मर्यादेचे पालन करावे, ओव्हरटेक टाळावा आणि वाहनांची नियमित तपासणी करूनच प्रवास करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.