शिवराज्याभिषेकपूर्व सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर किल्ले रायगडाचा पायी मार्ग तीन दिवस बंद


रायगड (जिमाका) : छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५३ व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर किल्ले रायगडावरील पर्यटक व शिवभक्तांच्या सुरक्षेसाठी ३० मे ते १ जून २०२६ या कालावधीत गडावरील पायी चढ-उताराचा मार्ग पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश उपविभागीय अधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष पोपट ओमासे यांनी दिले आहेत.
६ जून रोजी होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी राज्यभरातून मोठ्या संख्येने शिवभक्त व मान्यवर उपस्थित राहण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने सुरक्षा उपाययोजनांना प्राधान्य दिले आहे. महादरवाजाच्या खालच्या बाजूस तसेच नाणे दरवाजा पदपथ प्रवेशाच्या वरील उंच कड्यांवर असलेले सैल व धोकादायक दगड हटविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
सन २०२३ मधील शिवराज्याभिषेक सोहळ्यादरम्यान महादरवाजाजवळील कड्यावरून दगड कोसळल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी यंदा विशेष खबरदारी घेतली जात आहे. दुर्गवीर प्रतिष्ठान, मुंबई यांच्या सहकार्याने ३० मे, ३१ मे व १ जून रोजी धोकादायक दगड हटविण्याची मोहीम राबविण्यात येणार आहे.
उपविभागीय अभियंता, मार्ग प्रकल्प उपविभाग महाड यांनी या कामासाठी पायी मार्ग बंद ठेवण्याची विनंती केली होती. त्यानुसार आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून हा निर्णय घेण्यात आला आहे.
या कालावधीत चित दरवाजा, नाणे दरवाजा तसेच गडावरील शिरकाई मंदिर परिसरातील प्रवेशद्वारांवर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार असून नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, पायी मार्ग बंद असला तरी रायगड रोपवे सेवा नियमितपणे सुरू राहणार असल्याने पर्यटक व शिवभक्तांना रोपवेच्या माध्यमातून गडावर जाण्याची सुविधा उपलब्ध राहणार आहे.