डावाळे पाणीपुरवठा योजनेचे अपूर्ण काम पूर्ण; नागरिकांना दिलासा


अलिबाग (प्रतिनिधी) : ग्रामपंचायत नागावच्या हद्दीतील डावाळे परिसरातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाय करण्याच्या दृष्टीने राबविण्यात आलेल्या पाणीपुरवठा योजनेचे अपूर्ण राहिलेले काम पूर्ण करण्यात आल्याने स्थानिक नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
ग्रामपंचायत नागावच्या पंधरावा वित्त आयोग निधीतून डावाळे वापराचे पाणीपुरवठा योजनेसाठी सुमारे दीड किलोमीटर लांबीची पाईपलाईन, पंपिंग मशीन तसेच आवश्यक यंत्रसामग्री उभारण्यात आली होती. डावाळे तलावापासून नंदू काकांच्या घरापर्यंत संपूर्ण पाणीपुरवठा व्यवस्था उभारण्यात आली होती. या कामामुळे परिसरातील अनेक कुटुंबांना पिण्याच्या पाण्याचा लाभ मिळण्यास सुरुवात झाली.
मात्र, योजनेअंतर्गत पलीकडील ६ ते ७ घरांपर्यंत पाणी पोहोचविण्यासाठी शेताच्या बाजूने सुमारे ३०० मीटर लांबीची पाईपलाईन टाकणे आवश्यक होते. निधीअभावी हे काम काही काळ अपूर्ण राहिले होते. त्यामुळे संबंधित घरांतील नागरिकांना पाणीपुरवठ्याचा लाभ मिळण्यात अडचणी येत होत्या.
या समस्येची दखल घेत जिल्हा परिषद सदस्य डॉ. सचिन राऊळ यांनी पुढाकार घेत स्वखर्चातून सुमारे ३०० मीटर पाईपलाईन टाकण्याचे काम पूर्ण करून दिले. त्यामुळे योजनेचा लाभ आता सर्व संबंधित घरांपर्यंत पोहोचणार असून नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणात सुटणार आहे.
स्थानिक ग्रामस्थांनी या कामाबद्दल समाधान व्यक्त करत ग्रामपंचायत नागाव तसेच डॉ. सचिन राऊळ यांचे आभार मानले आहेत. पाणीपुरवठा योजनेचे अपूर्ण काम पूर्ण झाल्याने डावाळे परिसरातील नागरिकांना भविष्यात अधिक नियमित आणि सुरळीत पाणीपुरवठा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.