अलिबाग (प्रतिनिधी): महाराष्ट्र प्रदेश भाजपचे अध्यक्ष तथा माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत अलिबाग तालुक्यातील विविध प्रलंबित प्रश्नांबाबत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. जिल्हा सरचिटणीस ॲड. महेश मोहिते यांच्या पुढाकाराने झालेल्या या बैठकीत आरसीएफ स्कूल, उसर-गेल प्रकल्पग्रस्त, सांबरगुंड धरणग्रस्त तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील स्थानिकांना रोजगार यासह अनेक विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीत आरसीएफ स्कूलमधील शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांसमोरील शैक्षणिक अडचणींवर विशेष चर्चा झाली. गेल्या दोन वर्षांपासून शिक्षकांचे वेतन प्रलंबित असल्याने त्यांच्यावर मोठे आर्थिक संकट ओढवले असून, शाळेच्या भवितव्याबाबतही चिंता व्यक्त करण्यात आली. या प्रश्नांवर शासनाने तातडीने लक्ष घालावे, अशी मागणी करण्यात आली.
उसर आणि गेल परिसरातील प्रकल्पग्रस्तांच्या वतीने संघर्ष समितीचे नेते निलेश गायकर यांनी प्रशासनाकडून प्रकल्पग्रस्तांवर होत असलेल्या अन्यायाचा मुद्दा उपस्थित केला. नोकरीच्या संधींमध्ये प्रकल्पग्रस्तांना सातत्याने डावलले जात असल्याचा आरोप करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत स्वतंत्र बैठक आयोजित करण्याची मागणी त्यांनी केली. यावर लवकरच मुख्यमंत्री स्तरावर बैठक आयोजित करण्यात येईल, असे आश्वासन रवींद्र चव्हाण यांनी दिले.
सांबरगुंड धरण भूसंपादनाशी संबंधित विविध प्रलंबित प्रश्न, धरणग्रस्तांना नवीन भूसंपादन कायद्यानुसार योग्य मोबदला मिळणे तसेच इतर मागण्यांवरही सखोल चर्चा झाली. याशिवाय प्रस्तावित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या विषयालाही बैठकीत प्राधान्य देण्यात आले.
अलिबाग तालुक्यातील विविध विकासकामे, प्रलंबित प्रश्न आणि जनहिताच्या मागण्यांवर शासन स्तरावर सकारात्मक निर्णय घेण्यासाठी आवश्यक ती पावले उचलली जातील, असा विश्वास बैठकीत व्यक्त करण्यात आला.
या बैठकीस पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संजय पाटील, भाजप महिला मोर्चाच्या उपाध्यक्षा ॲड. मनस्वी मोहिते, अलिबाग मंडळ अध्यक्ष रोशन भगत, प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीचे नेते निलेश गायकर, आरसीएफ स्कूलचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी शिष्टमंडळ, उसर-गेल प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीचे प्रतिनिधी, मुरूडचे नेते महेश मानकर, युवा नेते ॲड. रोहन खोपकर यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Home ताज्या बातम्या अलिबागच्या प्रलंबित प्रश्नांवर भाजपची उच्चस्तरीय बैठक; आरसीएफ शाळा, प्रकल्पग्रस्त आणि धरणग्रस्तांच्या प्रश्नांवर...





