अलिबाग (प्रतिनिधी): अलिबाग-मुरुड विधानसभा मतदारसंघातील विविध विकासकामांना गती देण्याच्या उद्देशाने भारतीय जनता पक्षाच्या शिष्टमंडळाने जिल्हा परिषद अध्यक्षांची भेट घेऊन महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा केली. यामध्ये गेली परिसरातील सीएसआर (कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी) निधीअंतर्गत प्रस्तावित विकासकामांचा विषय विशेषत्वाने मांडण्यात आला.
शिष्टमंडळाने सांगितले की, गेली परिसरातील सीएसआर निधीशी संबंधित प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या अधिकारक्षेत्रात येत असल्याने त्याला लवकरात लवकर मान्यता मिळणे अत्यंत आवश्यक आहे. या माध्यमातून परिसरातील नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध होण्यास मदत होणार असून विकासकामांना गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
यावेळी मुरुड तालुक्यातील विविध प्रलंबित विकासकामे, स्थानिक पायाभूत सुविधा, ग्रामीण भागातील आवश्यक कामे तसेच आगामी काळात जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विकास योजनांबाबतही सकारात्मक चर्चा झाली. संबंधित कामांना प्राधान्य देण्याची मागणी शिष्टमंडळाने केली.
जिल्हा परिषद अध्यक्षांनी सर्व विषय गांभीर्याने ऐकून घेत संबंधित प्रस्तावांवर सकारात्मक भूमिका घेत विकासकामांना न्याय देण्याचे आश्वासन दिल्याची माहिती शिष्टमंडळाने दिली. आगामी काळात जिल्हा परिषद आणि लोकप्रतिनिधी यांच्या समन्वयातून अलिबाग-मुरुड मतदारसंघातील विकासकामांना अधिक वेग मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
या भेटीप्रसंगी भाजपचे जिल्हा सरचिटणीस ॲड. महेश मोहीते, निलेश गायकर, पंचायत समितीच्या सदस्या अश्विनीताई तसेच भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
Home ताज्या बातम्या जिल्हा परिषद अध्यक्षांची भाजप शिष्टमंडळाकडून भेट; गेली सीएसआरसह विविध विकासकामांवर सविस्तर चर्चा






