सोनम वांगचुक यांच्यावरील पोलिस कारवाई; आंदोलन संपले की अधिक तीव्र होणार?


मुंबई (विषेश प्रतिनिधी): दिल्लीतील जंतरमंतर मैदानावर गेल्या २० दिवसांपासून सुरू असलेल्या सोनम वांगचुक यांच्या आमरण उपोषणावर शनिवारी पहाटे दिल्ली पोलिसांनी कारवाई करत त्यांना ताब्यात घेऊन रुग्णालयात हलवले. त्यांच्या उपोषणाचा हा २१ वा दिवस होता. उपोषणामुळे त्यांची प्रकृती खालावली होती आणि वजनही मोठ्या प्रमाणात घटले होते. तरीही त्यांनी २१ तारखेला संसदेवर मोर्चा काढण्याचा निर्धार व्यक्त केला होता.
पोलिसांची ही कारवाई अत्यंत नियोजनबद्ध आणि गोपनीय पद्धतीने पार पडल्याचे सांगितले जात आहे. पहाटे आंदोलनस्थळी गर्दी कमी झाल्यानंतर साध्या वेशातील पोलिसांनी परिसराची पाहणी केली. त्यानंतर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला. स्टेजभोवती चादरींचा आडोसा तयार करून वांगचुक यांना तातडीने खाली आणण्यात आले आणि आधीपासूनच तयार ठेवलेल्या रुग्णवाहिकेतून सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याचवेळी उर्वरित आंदोलनकर्त्यांनाही हटवण्यात आले.
या कारवाईनंतर आंदोलनातील प्रमुख समन्वयक अभिजित दिपके यांनाही काही काळ पोलिसांनी रोखल्याचा आरोप करण्यात आला. पोलिसांनी धक्काबुक्की केल्याचाही दावा आंदोलनकर्त्यांनी केला आहे.
राजकीयदृष्ट्या या कारवाईचे महत्त्व मोठे मानले जात आहे. संसदेच्या अधिवेशनापूर्वी कायदा-सुव्यवस्था राखण्याच्या कारणास्तव सरकारने ही कारवाई केल्याचे मानले जात असले, तरी विरोधक आणि आंदोलनकर्त्यांच्या मते सरकारने चर्चेचा मार्ग न स्वीकारता आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला आहे.
आता सर्वात मोठा प्रश्न म्हणजे ही कारवाई आंदोलनाचा शेवट ठरेल की नव्या टप्प्याची सुरुवात करेल? अनेकदा अशा कारवायांमुळे आंदोलन कमकुवत होण्याऐवजी जनतेची सहानुभूती वाढते आणि ते अधिक व्यापक स्वरूप धारण करते. त्यामुळे पुढील काही दिवसांत आंदोलनकर्त्यांची भूमिका, सरकारची प्रतिक्रिया आणि संसदेच्या अधिवेशनादरम्यान घडणाऱ्या राजकीय घडामोडींवर या आंदोलनाचे भवितव्य अवलंबून असेल.
एकूणच, जंतरमंतरवरील आंदोलन तात्पुरते थांबले असले तरी या कारवाईमुळे निर्माण झालेला राजकीय आणि सामाजिक वाद आता आणखी तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही.