पेपरफुटी प्रकरणी विद्यार्थ्यांवरील लाठीमाराचा शेकापकडून निषेध; दोषींवर कठोर कारवाईची मागणी


अलिबाग (प्रतिनिधी) : नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणामुळे लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करण्यात आला असून, न्यायाच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरलेल्या विद्यार्थ्यांवर लाठीमार करून त्यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप करत शेतकरी कामगार पक्षाच्या प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे.
चित्रलेखा पाटील म्हणाल्या की, पेपरफुटीमुळे लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांवर पाणी फिरले आहे. अशा परिस्थितीत न्यायाची मागणी करणाऱ्या विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याऐवजी त्यांच्यावर लाठीमार करणे ही लोकशाहीला काळीमा फासणारी घटना आहे. ही लोकशाही नसून सत्तेची दडपशाही असल्याची टीका त्यांनी केली.
विद्यार्थ्यांचा आवाज दाबण्याचा प्रत्येक प्रयत्न लोकशाहीच्या मुळावर घाव घालणारा आहे. महाराष्ट्र हा छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समतावादी विचारांचा वारसा जपणारा प्रदेश असून, अन्यायासमोर कधीही झुकला नाही आणि भविष्यातही झुकणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
नीट पेपरफुटी प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करून विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, अशी मागणी करत विद्यार्थ्यांना न्याय मिळेपर्यंत शेतकरी कामगार पक्षाचा संघर्ष सुरूच राहील, असा इशाराही त्यांनी दिला. लाठीच्या जोरावर तरुणाईचा आवाज दाबण्याचा प्रत्येक प्रयत्न रस्त्यावरच परतवून लावला जाईल, असेही त्या म्हणाल्या.
विद्यार्थ्यांचा हा लढा केवळ एका परीक्षेपुरता मर्यादित नसून देशाच्या भवितव्याचा आणि लोकशाहीच्या संरक्षणाचा लढा आहे. त्यामुळे या आंदोलनाकडे केवळ कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने न पाहता विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांचा गांभीर्याने विचार करून सरकारने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी चित्रलेखा पाटील यांनी केली.