
महाड (प्रतिनिधी): दिल्लीत विद्यार्थ्यांनी पुकारलेल्या आंदोलनाला अखेर यश मिळाल्यानंतर रायगड जिल्हा काँग्रेसच्या वतीने महाड येथे जल्लोष साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या मागण्यांसमोर केंद्र सरकारला झुकावे लागल्याचा दावा काँग्रेसने करत, या विजयामागे भारतीय संविधानाची ताकद आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा मोठा वाटा असल्याचे प्रतिपादन रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजाभाऊ ठाकुर यांनी केले.
विद्यार्थी आंदोलन यशस्वी झाल्याच्या पार्श्वभूमीवर महाड येथील ऐतिहासिक चवदार तळे परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अभिवादन केले. यावेळी भारतीय संविधानाचा जयघोष करत विद्यार्थ्यांच्या विजयाचा आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष राजाभाऊ ठाकुर म्हणाले की, विद्यार्थ्यांना न्याय मिळण्यामागे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या संविधानाची शक्ती आहे. संविधानामुळेच प्रत्येक नागरिकाला लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा आणि आपला आवाज शासनापर्यंत पोहोचविण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे. विद्यार्थ्यांनी संविधानिक चौकटीत राहून लढा दिला आणि त्याचा सकारात्मक परिणाम देशासमोर दिसून आला, असे त्यांनी सांगितले.
लोकशाही मूल्यांचे आणि संविधानिक अधिकारांचे रक्षण करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने सतर्क व सजग राहण्याची गरज असल्याचेही ठाकुर यांनी नमूद केले. महाड ही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ऐतिहासिक कर्मभूमी असल्याने संविधान, समता आणि सामाजिक न्यायाचा संदेश येथून अधिक प्रभावीपणे दिला जातो. त्यामुळे विद्यार्थी आंदोलनाच्या विजयाच्या निमित्ताने महाडमधून संविधानाचा जागर करण्याचा संदेश देण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या कार्यक्रमाला काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संविधानाच्या समर्थनार्थ आणि विद्यार्थ्यांच्या विजयाच्या आनंदात घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला.






