
अलिबाग (प्रतिनिधी) : अलिबाग विद्यानगर-वरसोली येथील श्री स्वामी समर्थ मठात सद्गुरू श्री नवनितानंद महाराज यांच्या पावन सान्निध्यात श्री गुरुपौर्णिमा उत्सव बुधवारी अत्यंत भक्तिभावाने आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. पहाटेपासूनच मठात गुरुबंधू-भगिनी व भाविकांची मोठी उपस्थिती होती. संपूर्ण परिसर “श्री स्वामी समर्थ… जय जय स्वामी समर्थ” या अखंड नामघोषाने भक्तिमय झाला होता.
उत्सवानिमित्त सकाळी श्री स्वामी समर्थांच्या पादुकांचा विधिवत अभिषेक करण्यात आला. त्यानंतर वैदिक मंत्रोच्चारात होम-हवन पार पडले. या धार्मिक विधींमध्ये भाविकांनी श्रद्धापूर्वक सहभाग घेत गुरूंचे आशीर्वाद घेतले.
दुपारी आयोजित महाप्रसादाचा शेकडो भाविकांनी लाभ घेतला. सायंकाळी आरतीने उत्सवाची सांगता झाली. आरतीनंतरही महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. दिवसभर मठ परिसरात भक्तिमय आणि उत्साहाचे वातावरण अनुभवायला मिळाले.
अलिबाग विद्यानगर-वरसोली येथील श्री स्वामी समर्थ मठात पार पडलेल्या या उत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी मठातील सेवेकरी, गुरुबंधू-भगिनी आणि स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले. उपस्थित भाविकांनी सद्गुरूंच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करत सर्वांच्या सुख-समृद्धी व कल्याणासाठी प्रार्थना केली.




