खालापूर (प्रतिनिधी): शेतकरी कामगार पक्षाच्या (शेकाप) ७९ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य शेकापच्या प्रवक्त्या सौ. चित्रलेखा नृपाल पाटील यांनी पक्षाच्या विचारधारेचा पुनरुच्चार करत कार्यकर्त्यांना जनतेच्या प्रश्नांसाठी अधिक ताकदीने काम करण्याचे आवाहन केले. शेकाप हा केवळ राजकीय पक्ष नसून शेतकरी, कामगार, कष्टकरी आणि सर्वसामान्य जनतेच्या हक्कांसाठी सातत्याने लढणारी चळवळ असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी राज्यातील शेती, रोजगार, शिक्षण, आरोग्य आणि स्थानिक स्वराज्य संस्थांसमोरील विविध प्रश्नांवर भाष्य केले. सत्तेत असो वा विरोधात, शेकापने नेहमीच जनतेच्या हितासाठी संघर्षाची भूमिका घेतली असून, पक्षाची ही परंपरा पुढील काळातही अधिक बळकट केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
पक्षाच्या ७९ वर्षांच्या वाटचालीत अनेक ज्येष्ठ नेते, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या योगदानाचे स्मरण करत त्यांनी त्यांना अभिवादन केले. नव्या पिढीने शेकापच्या पुरोगामी विचारसरणीचा वारसा पुढे नेण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.
वर्धापनदिनानिमित्त राज्यभरातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते. उत्साहपूर्ण वातावरणात झालेल्या या कार्यक्रमात पक्षाच्या पुढील संघटनात्मक वाटचालीचा निर्धार व्यक्त करण्यात आला. कार्यकर्त्यांनी जनतेशी अधिक संवाद साधत स्थानिक प्रश्नांवर प्रभावीपणे काम करण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.
Home ताज्या बातम्या शेकापच्या ७९ व्या वर्धापनदिनानिमित्त महाराष्ट्र राज्य शेकाप प्रवक्त्या सौ. चित्रलेखा नृपाल पाटील...





