स्मृतिदिन शासकीय इतमामात साजरा करण्यासाठीही शासनस्तरावर पाठपुरावा : जिल्हाधिकारी किशन जावळे
अलिबाग (प्रतिनिधी) : भारताचे माजी लष्करप्रमुख आणि अलिबागचे सुपुत्र शहीद जनरल अरुणकुमार वैद्य यांचे त्यांच्या जन्मभूमीत स्मारक उभारण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करण्यात येतील. तसेच दरवर्षी १० ऑगस्ट रोजी साजरा होणारा त्यांचा स्मृतिदिन अलिबाग येथे शासकीय इतमामात साजरा करण्यासाठीही आवश्यक पाठपुरावा करण्यात येईल, असे प्रतिपादन रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केले.
जनरल अरुणकुमार वैद्य यांच्या स्मृतिदिनानिमित्त अलिबाग येथील शिशु विहार प्राथमिक शाळेत आयोजित अभिवादन कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी जावळे बोलत होते. यावेळी माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, उपनगराध्यक्षा मानसीताई म्हात्रे, ज्येष्ठ पत्रकार बळवंत वालेकर आणि आदर्श पतसंस्थेचे संस्थापक सुरेश पाटील यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते जनरल अरुणकुमार वैद्य यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी जनरल वैद्य यांच्या देशसेवेचे स्मरण करून त्यांना आदरांजली वाहिली.
जनरल अरुणकुमार वैद्य यांचे प्राथमिक शिक्षण अलिबाग येथे झाले. भारतीय लष्कराचे नेतृत्व करताना त्यांनी देशाचे अखंडत्व, सार्वभौमत्व आणि राष्ट्रीय एकात्मता अबाधित ठेवण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले. ‘ऑपरेशन ब्ल्यू स्टार’नंतर ते अतिरेक्यांच्या हिटलिस्टवर आले होते. लष्करातून निवृत्त झाल्यानंतर १० ऑगस्ट १९८६ रोजी पुणे येथे अतिरेक्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. या हल्ल्यात त्यांना वीरमरण आले.
जन्मभूमीत स्मारक उभारण्याची मागणी
स्वागतपर भाषणात ज्येष्ठ पत्रकार बळवंत वालेकर यांनी जनरल वैद्य यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या स्मृती जपण्यासाठी अलिबागमध्ये ठोस उपक्रम राबविण्याची गरज व्यक्त केली. जनरल वैद्य यांचा स्मृतिदिन अलिबाग येथे शासकीय इतमामात साजरा करण्यात यावा तसेच त्यांच्या जन्मगावी भव्य स्मारक उभारण्यात यावे, अशी मागणी त्यांनी शासनाकडे केली.
या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देताना जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी स्मारक उभारणीसाठी शासनस्तरावर प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. तसेच स्मृतिदिन शासकीय इतमामात साजरा करण्यासाठीही आवश्यक कार्यवाही करण्याबाबत प्रयत्न केले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी उपनगराध्यक्षा मानसीताई म्हात्रे आणि रघूजीराजे आंग्रे यांनीही मनोगत व्यक्त करून जनरल वैद्य यांच्या शौर्यपूर्ण कार्याला अभिवादन केले.
कार्यक्रमास माजी जिल्हा सरकारी वकील ॲड. प्रसाद पाटील, माजी नगरसेवक सुकुमार भगत, प्रा. पी. जी. गोखले, आदर्श पतसंस्थेचे संचालक विलास तांडेल, उद्योजक देवदत्त जोगळेकर, साहित्यिक विनोद टेंबुलकर, साहित्यिक राजाराम भगत, निवृत्त सहायक फौजदार चंद्रकांत वालेकर, निवृत्त लेखापाल देवळेकर, सामाजिक कार्यकर्ते महेंद्र ठाकूर, जिल्हा सैनिक कल्याण समितीचे अध्यक्ष संतोष तावडे, माजी सैनिक राजेंद्र म्हात्रे, माजी सैनिक सुदर्शन पाटील, वीरपत्नी निशिगंधा कांबळे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उमेश पाटील यांनी केले, तर सहायक शिक्षिका रूपा कोळी यांनी आभार मानले.
विद्यार्थ्यांशी जिल्हाधिकाऱ्यांचा संवाद
कार्यक्रमानंतर जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी शिशु विहार प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांची आस्थेने ओळख करून घेत त्यांनी त्यांच्याशी संवाद साधला. विद्यार्थ्यांसोबत छायाचित्र काढण्यासही त्यांनी आनंदाने संमती दिली. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.






