पालकमंत्री भरत गोगावले यांचे आश्वासन; अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश
अलिबाग (प्रतिनिधी): ज्येष्ठ निरुपणकार डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या स्मारकाचा विषय मार्गी लावण्यासाठी गणेशोत्सवानंतर संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात येईल. स्मारकाच्या कामासंदर्भातील प्रलंबित बाबींचा आढावा घेऊन आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री भरत गोगावले यांनी दिले.
डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांनी समाजप्रबोधन, व्यसनमुक्ती, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून समाजावर मोठा प्रभाव निर्माण केला. त्यांच्या कार्याची प्रेरणा पुढील पिढ्यांना मिळावी, तसेच त्यांच्या कार्याचा गौरव व्हावा, यासाठी स्मारक उभारण्याची मागणी सातत्याने केली जात आहे.
मात्र, स्मारकाच्या उभारणीसंदर्भातील विविध प्रशासकीय बाबी आणि आवश्यक परवानग्यांमुळे हा विषय प्रलंबित असल्याचे सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री भरत गोगावले यांनी गणेशोत्सवानंतर संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन संपूर्ण विषयाचा आढावा घेण्याचे स्पष्ट केले आहे.
या बैठकीत स्मारकासाठी आवश्यक असलेली जागा, प्रशासकीय प्रक्रिया, परवानग्या तसेच इतर प्रलंबित बाबींवर चर्चा करून पुढील कार्यवाही निश्चित केली जाणार आहे. त्यामुळे डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या स्मारकाचा विषय लवकरच मार्गी लागण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
“गणेशोत्सवानंतर अधिकाऱ्यांची बैठक घेऊन डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या स्मारकाचा विषय मार्गी लावण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात येईल,” असे पालकमंत्री भरत गोगावले यांनी सांगितले.








