आठ सदस्यांचे पथक, श्वानपथकासह न्यायालयातील प्रत्येक कक्षाची झाडाझडती; संशयास्पद वस्तू न आढळल्याने सर्वांनी सोडला सुटकेचा नि:श्वास
अलिबाग (प्रतिनिधी) : राज्यातील विविध जिल्हा न्यायालयांना बॉम्ब ठेवल्याची धमकी देणारे ई-मेल प्राप्त झाल्याने संपूर्ण यंत्रणा सतर्क झाली आहे. या धमकीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी (२ नोव्हेंबर) दुपारी अलिबाग येथील जिल्हा न्यायालयातही पोलिसांकडून विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली. बॉम्बशोधक व नाशक पथक, श्वानपथक आणि पोलिस अधिकाऱ्यांनी न्यायालयाच्या संपूर्ण परिसराची कसून तपासणी केली. मात्र, या तपासणीदरम्यान कोणतीही संशयास्पद किंवा बॉम्बसदृश्य वस्तू आढळून न आल्याने न्यायालय प्रशासन, वकील, कर्मचारी आणि नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
राज्यातील अनेक जिल्हा न्यायालयांना बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी देणारे ई-मेल प्राप्त झाल्याची माहिती समोर आल्यानंतर पोलिस प्रशासनाने तातडीने खबरदारीच्या उपाययोजना सुरू केल्या. न्यायालयासारख्या संवेदनशील ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी अलिबाग जिल्हा न्यायालयातही सुरक्षा यंत्रणा तैनात करण्यात आली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस अधिकारी आणि आठ सदस्यांचे बॉम्बशोधक व नाशक पथक तत्काळ न्यायालयात दाखल झाले.
त्यानंतर श्वानपथकाच्या मदतीने न्यायालयातील प्रत्येक कक्षाची बारकाईने तपासणी करण्यात आली. न्यायालयातील विविध विभाग, वकील बार, विधी सेवा विभाग, कार्यालयीन परिसर तसेच न्यायालयाच्या आवारातील वाहनांचीही झडती घेण्यात आली. संभाव्य धोका लक्षात घेऊन पथकाने प्रत्येक ठिकाणाची काळजीपूर्वक पाहणी केली. संपूर्ण तपासणी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत पोलिसांकडून विशेष दक्षता घेण्यात आली.
या तपासणीदरम्यान कुठेही बॉम्बसदृश्य वस्तू किंवा संशयास्पद साहित्य आढळून आले नाही. त्यामुळे संभाव्य धोका टळल्याचे स्पष्ट झाल्यानंतर न्यायालय प्रशासनासह वकील आणि कर्मचाऱ्यांनी दिलासा व्यक्त केला.
दरम्यान, धमकीचा ई-मेल नेमका कोणी पाठविला, तो कोणत्या ठिकाणाहून पाठविण्यात आला आणि त्यामागील उद्देश काय आहे, याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. ही धमकी केवळ खोडसाळपणा आहे की त्यामागे काही गंभीर कट आहे, याचाही तपास केला जात आहे.
न्यायालयांना अशा प्रकारचे धमकीचे ई-मेल प्राप्त झाल्याने न्यायव्यवस्थेच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. तपासणीमध्ये कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नसली, तरी भविष्यात अशा प्रकारच्या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी अलिबाग जिल्हा न्यायालयातील सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. पोलिस प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत असून नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.









