दीपावली, भाऊबीजेच्या उत्साहावर वाहतूक कोंडीचे विरजण!


चेंढरे-कुरुळ बायपास ते बेलकडे मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा; बेलकडे ते अलिबाग प्रवासासाठी लागत आहे तब्बल एक तास

अलिबाग (अमोल नाईक) : दीपावली आणि भाऊबीजेच्या सणानिमित्त नागरिकांची मोठ्या प्रमाणात ये-जा सुरू असतानाच चेंढरे-कुरुळ बायपास ते बेलकडे मार्गावर भीषण वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. विशेषतः भाऊबीजेनिमित्त आपल्या बहिणींच्या भेटीसाठी निघालेल्या भाऊरायांना या वाहतूक कोंडीचा चांगलाच फटका बसत आहे.

सणासुदीच्या काळात या मार्गावर वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यातच रस्त्याची अरुंद रुंदी आणि ठिकठिकाणी सुरू असलेली रस्त्याच्या कामांमुळे वाहतुकीचा वेग मंदावला आहे. परिणामी, बेलकडे ते अलिबाग या प्रवासासाठी जवळपास एक तासाचा कालावधी लागत आहे. नेहमी काही मिनिटांत पूर्ण होणाऱ्या प्रवासासाठी वाहनचालकांना तासभर वाहतूक कोंडीत अडकून राहावे लागत आहे.

भाऊबीज हा भाऊ-बहिणीच्या प्रेमाचा आणि जिव्हाळ्याचा सण. या दिवशी बहिणीची भेट घेण्यासाठी अनेक भाऊ आपल्या कुटुंबीयांसह प्रवासाला निघाले आहेत. मात्र, रस्त्यावरील वाहतूक कोंडीमुळे त्यांच्या आनंदावर विरजण पडत आहे. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांनाही या कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे.

सणासुदीच्या काळात वाहतुकीचे योग्य नियोजन करणे आवश्यक असताना या मार्गावर निर्माण झालेली परिस्थिती प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे. संबंधित विभागाने तातडीने वाहतूक सुरळीत करण्यासाठी उपाययोजना कराव्यात, तसेच सुरू असलेली रस्त्याची कामे वेगाने पूर्ण करावीत, अशी मागणी वाहनचालक आणि प्रवाशांकडून होत आहे.