‘फॅन्सी ग्रुप नागाव’च्या वतीने उत्साहात संपन्न झाली किल्ला बनविणे स्पर्धा!


अलिबाग (प्रतिनिधी): ‘फॅन्सी ग्रुप नागाव’च्या वतीने नुकतीच नागाव येथील बदामी बीचवर अत्यंत उत्साही वातावरणात ‘किल्ला बनविणे स्पर्धा’ पार पडली. “वाळूमध्ये उभा करा आपला किल्ला!” या संकल्पनेवर आधारित या स्पर्धेला बालगोपाळांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वच स्तरातून प्रचंड प्रतिसाद मिळाला.

या भव्य स्पर्धेचे उद्घाटन रायगड जिल्हा परिषद सदस्य डॉ. सचिन राऊळ यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विकास पिंपळे यांनी अतिशय उत्कृष्टरीत्या पार पाडले.

या चुरशीच्या स्पर्धेत मोठ्या गटातून ‘श्री स्वामी समर्थ खारवली’ संघाने प्रतापगड साकारत प्रथम क्रमांक पटकावला, तर ‘श्री गणेश कोठारभाट’ संघाने कुलाबा किल्ला बनवत द्वितीय क्रमांक मिळवला आणि ‘मंथन प्रताळे हटाळे’ संघाने सुवर्णदुर्ग साकारत तृतीय क्रमांक पटकावला. तसेच छोट्या गटातून ‘श्री गणेश स्पोर्टस’ संघाने खंदेरी किल्ला बनवून प्रथम क्रमांक आपल्या नावावर केला; ‘शिवरायांच्या लेकी’ या संघाने सिंधुदुर्ग साकारत द्वितीय क्रमांक मिळवला, तर ‘दुर्ग कन्या’ या संघाने विजयदुर्ग साकारत तृतीय क्रमांक पटकावला. सर्व विजयी स्पर्धकांवर सर्वच स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

या स्पर्धेत मोठ्या प्रमाणात स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. गावातील ग्रामस्थ तसेच बाहेरून आलेले पर्यटक यांची या ठिकाणी प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. लहान व मोठ्या सर्वच स्पर्धकांनी वाळूपासून विविध प्रकारचे हुबेहूब किल्ले यावेळी बनवले होते. एकाच ठिकाणी विविध ऐतिहासिक किल्ले पाहायला मिळाल्यामुळे त्यांची महती अनुभवण्याची एक वेगळीच मजा सर्वांना आली. एकाच वेळी एवढे सुंदर किल्ले बघायला मिळाल्यामुळे उपस्थित सर्वच नागरिक आणि पर्यटक अत्यंत आनंदित झाले होते.

लहान मुलांच्या कलागुणांना वाव देणारी आणि शिवछत्रपतींच्या इतिहासाची आठवण करून देणारी ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी फॅन्सी ग्रुप नागावच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.

आज या स्पर्धेत लहान बालकांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वच स्पर्धकांनी ज्या उत्साहाने आणि तन्मयतेने वाळूवर सुंदर व हुबेहूब किल्ले साकारले आहेत, ते खरोखरच थक्क करणारे आहे. या निमित्ताने आपल्या गड-किल्ल्यांचा ऐतिहासिक वारसा नवीन पिढीपर्यंत पोहोचवण्याचे एक उत्तम माध्यम निर्माण झाले आहे. एकाच ठिकाणी एवढे विविध किल्ले डोळ्यांचे पारणे फेडणारे ठरले असून, ग्रामस्थ व पर्यटकांची झालेली ही अभूतपूर्व गर्दी या उपक्रमाच्या यशाची साक्ष देते.