मारहाण आणि धमकी प्रकरणी अलिबागच्या मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांचा महत्त्वपूर्ण निकाल; बालदी यांच्यासह चार आरोपींना शिक्षा, मात्र सर्वांना जामीन मंजूर
अलिबाग (प्रतिनिधी): उरणचे भाजप आमदार महेश बालदी यांना तीन वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. मारहाण आणि धमकी दिल्याच्या प्रकरणात अलिबाग येथील मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयाने हा महत्त्वपूर्ण निकाल दिला. आमदार महेश बालदी यांच्यासह एकूण चार आरोपींना न्यायालयाने दोषी ठरवत तीन वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. या निकालामुळे रायगडच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
उरण येथे घडलेल्या मारहाण आणि धमकीच्या प्रकरणी अलिबाग न्यायालयात खटला सुरू होता. या खटल्याच्या सुनावणीनंतर मुख्य न्यायदंडाधिकारी यांनी चारही आरोपींना दोषी ठरवत शिक्षा सुनावली. त्यामुळे विद्यमान आमदारालाच न्यायालयाने कारावासाची शिक्षा सुनावल्याने या निकालाची जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
मात्र, शिक्षा सुनावल्यानंतर आमदार महेश बालदी यांच्यासह चारही आरोपींना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे शिक्षा सुनावण्यात आली असली तरी आरोपींना तातडीने कारागृहात जावे लागणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
या प्रकरणाचा निकाल आणि त्यानंतर मिळालेला जामीन यामुळे राजकीय तसेच कायदेशीर वर्तुळात विविध चर्चांना सुरुवात झाली आहे. विद्यमान आमदाराला फौजदारी प्रकरणात तीन वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा झाल्याने भाजपसाठीही हा निकाल महत्त्वाचा मानला जात आहे.
दरम्यान, या निकालाचा आमदारकीवर आणि पुढील राजकीय वाटचालीवर काय परिणाम होणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.









