आरसीएफ प्रकल्पग्रस्त आणि कामगारांच्या प्रश्नांवर केंद्रीय मंत्र्यांचे लक्ष वेधले; आमदार महेंद्र दळवी यांची भेट


आरसीएफमधील स्थानिक प्रकल्पग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न आणि कामगारांच्या समस्यांवर ठोस कार्यवाही करण्याची मागणी

अलिबाग (प्रतिनिधी) : आरसीएफ (राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स) कंपनीतील स्थानिक प्रकल्पग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न, कंपनीशी संबंधित विविध समस्या तसेच कामगारांच्या अडचणी मार्गी लावण्यासाठी अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी केंद्रीय मंत्र्यांचे लक्ष वेधले.

आमदार महेंद्र दळवी यांनी केंद्रीय मंत्री नामदार मुरलीधर आण्णा मोहोळ यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान आरसीएफ कंपनीतील स्थानिक प्रकल्पग्रस्तांचे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले प्रश्न, कंपनी प्रशासनाशी संबंधित विविध मुद्दे आणि कामगारांच्या समस्यांबाबत मंत्र्यांशी सविस्तर चर्चा केली.

स्थानिक प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळावा, त्यांच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय व्हावा तसेच कामगारांच्या अडचणी दूर करून संबंधित प्रश्नांची प्रभावीपणे सोडवणूक व्हावी, यासाठी केंद्रीय स्तरावर हस्तक्षेप करून ठोस पाठपुरावा करण्याची मागणी आमदार महेंद्र दळवी यांनी केली.

आरसीएफ कंपनीशी संबंधित स्थानिक नागरिक, प्रकल्पग्रस्त आणि कामगारांचे प्रश्न दीर्घकाळ प्रलंबित राहू नयेत, यासाठी या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देऊन आवश्यक कार्यवाही करण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

या भेटीतून आरसीएफमधील स्थानिक प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांना तसेच कामगारांच्या समस्यांना केंद्रीय स्तरावर न्याय मिळवून देण्यासाठी पुढाकार घेण्यात आला असून, आगामी काळात या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी पाठपुरावा केला जाणार आहे.