ॲड.महेश मोहिते यांना ‘परप्रांतीय’ संबोधल्याचा निषेध; अलिबागमध्ये जोरदार घोषणाबाजी, भाजप कार्यकर्त्यांचा शिवसेनेला इशारा
अलिबाग (प्रतिनिधी): रायगड जिल्ह्यात भाजप आणि शिवसेनेतील राजकीय संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होताना दिसत आहे. शिवसेनेचे रायगड जिल्हाप्रमुख राजा केणी यांनी भाजपचे जिल्हा सरचिटणीस ॲड. महेश मोहिते यांचा ‘परप्रांतीय’ असा उल्लेख केल्याच्या निषेधार्थ भाजपच्या वतीने आज अलिबागमध्ये आंदोलन करण्यात आले. या आंदोलनादरम्यान भाजप कार्यकर्त्यांनी राजा केणी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आपला संताप व्यक्त केला.
काही दिवसांपूर्वी भाजप आणि शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांमध्ये सुरू झालेल्या शाब्दिक संघर्षाचे पडसाद आता रस्त्यावर उमटू लागले आहेत. महेश मोहिते यांच्याबाबत राजा केणी यांनी केलेल्या वक्तव्याचा भाजप कार्यकर्त्यांनी तीव्र निषेध केला. यावेळी आंदोलनकर्त्यांनी शिवसेनेच्या नेत्यांच्या शैक्षणिक पात्रतेवरही प्रश्न उपस्थित करत त्यांच्यावर टीका केली. संतप्त कार्यकर्त्यांनी काही शिवसेना नेत्यांचा उल्लेख ‘गाढव’ असा करत आक्रमक घोषणाबाजी केली.
दरम्यान, आजचे आंदोलन ही केवळ झांकी असून, यापुढे आणखी बरेच काही पाहायला मिळेल, असा इशाराही भाजप कार्यकर्त्यांनी दिला. त्यामुळे भाजप आणि शिवसेनेतील स्थानिक राजकीय वाद आता वैयक्तिक टीका आणि आंदोलनांपर्यंत पोहोचल्याचे चित्र आहे.
महायुतीमध्ये दोन्ही पक्ष सत्तेत एकत्र असले तरी रायगड जिल्ह्यातील स्थानिक राजकारणात मात्र दोन्ही पक्षांच्या नेत्यांमधील मतभेद उघडपणे समोर येत आहेत. या वादावर वरिष्ठ नेते काय भूमिका घेतात आणि दोन्ही पक्षांतील हा संघर्ष कसा मिटवला जातो, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
यावेळी अलिबाग पंचायत समिती सदस्य प्रियंदर्शनी पाटील भाजप महिला आघाडीच्या नेत्या मनस्वी मोहिते, संजय पाटील, उदय काठे,अशोक वारगे, रोशन भगत, स्वप्नील गाडे,उपस्थित होते.









