ॲड. अंकित बंगेरा यांची भाजप विधी प्रकोष्ठाच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती


भाजप सरचिटणीस ॲड. महेश मोहिते यांनी दिल्या शुभेच्छा; अलिबाग तालुकाध्यक्ष रोशन भगत उपस्थित

अलिबाग (प्रतिनिधी) : रायगड जिल्ह्यातील नामांकित वकील ॲड. अंकित बंगेरा यांची भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेश विधी प्रकोष्ठाच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या या नियुक्तीमुळे रायगड जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

ॲड. अंकित बंगेरा यांची विधी क्षेत्रातील कामगिरी, अनुभव आणि पक्षाशी असलेली निष्ठा लक्षात घेऊन त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती झाल्याबद्दल भाजपचे जिल्हा सरचिटणीस ॲड. महेश मोहिते यांनी त्यांची भेट घेऊन अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी अलिबाग तालुकाध्यक्ष रोशन भगत यांच्यासह भाजपचे अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. ॲड. अंकित बंगेरा यांच्या नियुक्तीमुळे रायगड जिल्ह्यातील विधी क्षेत्रातील कार्यकर्त्यांना पक्षाच्या माध्यमातून अधिक प्रभावीपणे काम करण्याची संधी मिळेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.

त्यांच्या या नियुक्तीबद्दल विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, आगामी काळात विधी प्रकोष्ठच्या माध्यमातून पक्षाचे संघटनात्मक कार्य अधिक बळकट करण्यासाठी ते योगदान देतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.