अलिबाग-मुरुड विधानसभा क्षेत्रातील विविध विकासकामांवर चर्चा; वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री सहायता निधीस आर्थिक योगदान
अलिबाग (प्रतिनिधी) : अलिबाग-मुरुड विधानसभा क्षेत्रातील विविध विकासकामे आणि प्रलंबित प्रश्नांबाबत भाजपचे जिल्हा सरचिटणीस ॲड. महेश मोहिते यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान मतदारसंघातील विविध विकासकामांसंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून त्यांना निवेदन सादर करण्यात आले.
महाराष्ट्रात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकांना मदतीचे आवाहन केले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत ॲड. महेश मोहिते यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी १ लाख ११ हजार रुपयांचा धनादेश मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केला. सामाजिक बांधिलकी जपत संकटग्रस्त नागरिकांच्या मदतीसाठी योगदान देण्याचा हा उपक्रम असल्याचे यावेळी अधोरेखित झाले.
वाढदिवसाच्या निमित्ताने केवळ उत्सव साजरा न करता सामाजिक कार्यातून समाजाप्रती आपले उत्तरदायित्व निभावण्याचा संदेश या आर्थिक मदतीतून देण्यात आला. दुष्काळसदृश परिस्थितीत गरजू नागरिकांना मदत मिळावी आणि मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून संकटग्रस्तांना आधार मिळावा, या भावनेतून हे योगदान देण्यात आले.
अलिबाग-मुरुड विधानसभा क्षेत्राच्या विकासासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करतानाच सामाजिक कार्यातून जनतेला मदत करण्याचा प्रयत्न या भेटीच्या माध्यमातून करण्यात आला.









