विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ झाल्याचा आरोप; संघटनांचा आक्रमक पवित्रा


रायगड (प्रतिनिधी): शैक्षणिक प्रक्रियेत झालेल्या कथित गैरप्रकारांमुळे आता विद्यार्थी संघटना आणि शैक्षणिक संस्थांनी आक्रमक भूमिका घेतली असून, या प्रकरणाच्या निषेधार्थ आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्यातील तब्बल आठ स्थानिक विद्यार्थी संघटना तसेच विविध शैक्षणिक संस्थांनी एकत्र येत प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
विद्यार्थ्यांच्या परीक्षा, प्रवेश प्रक्रिया आणि निकालासंदर्भात निर्माण झालेल्या गोंधळामुळे हजारो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाल्याचा आरोप संघटनांकडून करण्यात येत आहे. संबंधित प्रकरणात केवळ तांत्रिक बिघाडाचा मुद्दा नसून, विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी गंभीर स्वरूपाचा खेळ झाल्याचे संघटनांचे म्हणणे आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
शेकापक्ष पुरोगामी विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष हर्ष दत्ता ढवळे यांनी याबाबत तीव्र प्रतिक्रिया देताना सांगितले की, “हा केवळ तांत्रिक बिघाड नसून लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी केलेला खेळ आहे. जोपर्यंत या प्रकरणाचा अंतिम निकाल लागत नाही आणि संशयास्पद बाबींची निष्पक्ष चौकशी होत नाही, तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही.”
दरम्यान, विद्यार्थी संघटनांनी आंदोलनाची रूपरेषा आखण्यास सुरुवात केली असून, लवकरच मोर्चा, धरणे आंदोलन आणि निवेदन देण्याचा इशारा प्रशासनाला देण्यात आला आहे. या प्रकरणामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्येही संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.