नेत्यांची उधळपट्टी आणि जनतेचा त्याग: जबाबदारी घेणारे नेतृत्व हरवलंय का?


मुंबई(धनश्री रेवडेकर): भारताला अशा महान नेत्यांचा वारसा लाभला आहे ज्यांनी शब्दांपेक्षा कृतीवर भर दिला. १९६५ च्या अन्नधान्य तुटवड्याच्या काळात लाल बहादूर शास्त्रीजींनी देशाला आठवड्यातून एक दिवस उपवास करण्याचे आवाहन केले होते. पण हे आवाहन करण्यापूर्वी त्यांनी स्वतःच्या घरात चूल पेटवणे बंद केले आणि स्वतः उपाशी राहून त्याची सुरुवात केली. रेल्वे मंत्री असताना अपघाताची नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा देणारे शास्त्रीजी असोत, किंवा आयुष्यभर फाटलेलं बनियान आतमध्ये घालून वरून जॅकेट घालणारे साधे व्यक्तिमत्व; या नेत्यांनी ‘आधी केले मग सांगितले’ हा वस्तुपाठ घालून दिला होता.

​केवळ शास्त्रीजीच नव्हे, तर सरदार वल्लभभाई पटेलांनी ढासळत्या प्रकृतीची पर्वा न करता साडेपाचशे संस्थाने एकत्र करून अखंड भारत घडवला. पंडित नेहरूंनी आपली संपत्ती आणि घर देशाला अर्पण केले, तर महात्मा गांधीजींनी देशातील दरिद्री जनतेसाठी स्वतः केवळ एका पंचावर राहण्याचा निर्णय घेतला. या नेत्यांकडे नैतिक अधिष्ठान होते कारण त्यांनी जनतेला त्याग करायला सांगण्यापूर्वी स्वतः त्याग करून दाखवला होता. नेत्यांचा त्याग पाहून जनताही आनंदाने देशासाठी कष्ट सोसायला तयार असायची.

मात्र, आजच्या राजकारणात हा नैतिक पाया ढासळलेला दिसतो. आजचे राज्यकर्ते जनतेला ‘खर्च कमी करा’ किंवा ‘इंधन वाचवा’ असे आवाहन करतात, पण स्वतः मात्र कोट्यवधींच्या विदेशी गाड्यांमधून फिरतात. एका बाजूला आर्थिक बचतीचे सल्ले दिले जातात आणि दुसऱ्या बाजूला केवळ राजकीय प्रचारासाठी काढल्या जाणाऱ्या रॅलींवर जनतेच्या करातील कोट्यवधी रुपये उधळले जातात. जनतेने नेहमी सॅक्रिफाईज करायचे आणि नेत्यांनी मात्र सर्व सोयीसुविधा उपभोगून अवाढव्य खर्च करायचा, हा विरोधाभास मनाला पटणारा नाही. आज आपल्याला पुन्हा अशा नेत्यांची गरज आहे जे जबाबदारी झटकणार नाहीत, तर स्वतःपासून बदलाची सुरुवात करून जनतेला प्रेरणा देतील.