“अच्छे दिन कुणाचे आले?”; इंधनदरवाढीवरून काँग्रेसचा केंद्र सरकारवर हल्लाबोल


मुंबई (धनश्री रेवडेकर) : पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या मुद्द्यावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केंद्र सरकार आणि तेल कंपन्यांवर जोरदार टीका केली आहे. “अच्छे दिन कुणाचे आले? तेल कंपन्यांचे की जनतेचे?” असा सवाल उपस्थित करत त्यांनी वाढत्या इंधनदरांमुळे सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक कंबरडे मोडत असल्याचा आरोप केला.
सपकाळ म्हणाले की, देशातील तेल कंपन्यांनी तब्बल ७७ हजार कोटी रुपयांचा नफा कमावला असतानाही पेट्रोल आणि डिझेलचे दर सातत्याने वाढवले जात आहेत. गेल्या अवघ्या दहा दिवसांत इंधनाच्या दरात प्रति लिटर सुमारे ७.५० रुपयांची वाढ झाल्याचा दावा त्यांनी केला. ही दरवाढ म्हणजे महागाईच्या आगीत तेल ओतण्यासारखी असल्याचे त्यांनी म्हटले.
इंधनदरवाढीमुळे वाहतूक खर्च वाढत असून त्याचा थेट परिणाम जीवनावश्यक वस्तूंच्या किमतींवर होत आहे. आधीच महागाई, बेरोजगारी आणि वाढत्या खर्चामुळे त्रस्त असलेल्या सामान्य नागरिकांवर सरकार आणखी आर्थिक भार टाकत असल्याची टीका सपकाळ यांनी केली.
केंद्र सरकारने तेल कंपन्यांच्या नफ्याचा विचार करण्याऐवजी सामान्य जनतेला दिलासा देण्यावर भर द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली. तसेच पेट्रोल-डिझेलवरील कर कमी करून इंधनाचे दर नियंत्रणात आणावेत, असे आवाहन काँग्रेसकडून करण्यात आले आहे.
इंधनदरवाढीच्या मुद्द्यावरून राज्यात राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे असून विरोधकांकडून सरकारविरोधात आंदोलनाची तयारी सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.