एका महिन्याचा कालावधी आपल्या हातात; आळस न करता पक्षासाठी काम करा – मंत्री भरत गोगावले


अलिबाग (प्रतिनिधी): आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार यादी विशेष गहन पुनरीक्षण (SIR) अभियान आणि बूथस्तरावरील संघटन अधिक मजबूत करण्यासाठी शिवसेना पक्षाच्या वतीने अलिबाग, मुरुड आणि रोहा तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांसाठी विशेष BLA प्रशिक्षण व मार्गदर्शन मेळावा आयोजित करण्यात आला. या मेळाव्यात रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी कार्यकर्त्यांना सज्ज राहण्याचे आवाहन करत पक्ष संघटन अधिक मजबूत करण्यावर भर दिला.
या मेळाव्यास अलिबाग-मुरुडचे आमदार महेंद्र दळवी, कोकण विभागीय सहसंपर्क प्रमुख प्रदीप खाडे, रायगड लोकसभा संपर्क प्रमुख अनिल नवगणे, जिल्हाप्रमुख राजा केणी, उपजिल्हाप्रमुख भरत बेलोसे, निलेश घाटवळ, अनंत गोंधळी तसेच शिवसेनेचे विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
मार्गदर्शन करताना मंत्री भरत गोगावले म्हणाले, “२४ वर्षांनंतर आज हा योग आलेला आहे. पुढे काय होईल हे कोणी सांगू शकत नाही. त्यामुळे आगामी निवडणुकांसाठी प्रत्येक कार्यकर्त्याने पूर्ण ताकदीने कामाला लागणे गरजेचे आहे. आपल्या हातात केवळ एका महिन्याचा कालावधी असून या काळात आळस न करता पक्षासाठी कार्य करा.”
मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रियेबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, “राज्यात मोठ्या प्रमाणात मतदारांची नावे कमी होण्याची शक्यता आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात दहा-बारा हजार मते कमी झाली, तर त्याचा मोठा तोटा पक्षाला सहन करावा लागू शकतो.”
“शासनाने नेमलेले बीएलओ काही वेळा पक्षविरोधी पद्धतीने काम करू शकतात. त्यामुळे प्रत्येक BLA ने बीएलओसोबत प्रत्यक्ष क्षेत्रात फिरणे आवश्यक आहे. प्रत्येक बूथवर दोन BLA नेमले पाहिजेत आणि बीएलओ काय विचारतो, कोणती माहिती घेतो यावर बारकाईने लक्ष ठेवले पाहिजे,” असेही गोगावले यांनी स्पष्ट केले.
तसेच पक्षाच्या अंतर्गत रणनीती आणि हिताच्या बाबी चार भिंतीआड राहणे आवश्यक असल्याचे सूचक विधान त्यांनी केले. “आपले मित्रपक्ष अत्यंत सूक्ष्म पद्धतीने काम करत आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी अधिक सतर्क राहून बूथस्तरावर संघटन मजबूत करणे गरजेचे आहे,” असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी आमदार महेंद्र दळवी यांनीही कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना आधुनिक तंत्रज्ञान आणि डिजिटल प्रणालीचा वापर करून पक्ष अधिक सक्षम करण्याची गरज व्यक्त केली. “कोकण हा शिवसेनेचा कणा आहे. त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्याने पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी सक्रिय राहिले पाहिजे,” असे ते म्हणाले.
मेळाव्याच्या शेवटी उपस्थित कार्यकर्त्यांनी आगामी निवडणुकांसाठी सज्ज राहण्याचा निर्धार व्यक्त करत “शिवसेनेचा एकही मतदार डिलीट होऊ देणार नाही,” असा संकल्प केला.