मैदानातून सांघिक भावना आणि खेळाडूवृत्ती घडते : सुनील तटकरे


वाडगाव येथे कुस्ती प्रशिक्षण केंद्र, सार्वजनिक व्यायामशाळा व स्वागत कमानीचे लोकार्पण

अलिबाग (प्रतिनिधी): मैदानातून माणसाला अनेक गोष्टी शिकायला मिळतात. मैदान सांघिक भावना निर्माण करण्याबरोबरच खेळाडूवृत्ती, शिस्त आणि सकारात्मक दृष्टिकोन घडवते. क्रीडांगणाशी संबंध नसलेल्या व्यक्तींना खेळकरपणा आणि खेळाडूवृत्ती समजणे कठीण असते. त्यामुळे आत्मकेंद्रित विचार करणारे लोक आपल्या मर्यादित चौकटीतूनच बोलत असतात. मात्र, क्रीडांगणे व्यक्तिमत्त्वाला चौफेर आकार देण्याचे काम करतात. मैदानापासून दूर राहिलेल्यांना मैदानाची भाषा आणि भावना कधीच समजत नाहीत, अशी टीका कोणाचेही नाव न घेता खासदार सुनील तटकरे यांनी केली.
अलिबाग तालुक्यातील वाडगाव ग्रामपंचायत हद्दीत प्रवेशद्वार, खासदार सुनील तटकरे कुस्ती प्रशिक्षण केंद्र आणि स्व. दिलीप आंग्रे सार्वजनिक व्यायामशाळेच्या लोकार्पण सोहळ्याचे आयोजन रविवारी (२० सप्टेंबर) करण्यात आले होते. या कार्यक्रमाला खासदार सुनील तटकरे प्रमुख उपस्थित होते. अध्यक्षीय भाषणातून त्यांनी क्रीडा, मैदाने आणि खेळाडूवृत्तीचे महत्त्व अधोरेखित केले.
खासदार तटकरे यांच्या हस्ते कुस्ती प्रशिक्षण केंद्र, स्वागत कमान आणि सार्वजनिक व्यायामशाळेचे नारळ फोडून व फीत कापून उद्घाटन करण्यात आले. यावेळी बोलताना त्यांनी क्रीडा क्षेत्राशी असलेल्या आपल्या भावनिक संबंधांचाही उल्लेख केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार तसेच स्व. अजित पवार यांनी विविध क्रीडा संस्थांच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटचालीतही क्रीडा क्षेत्राशी जवळचा संबंध राहिला असल्याचे त्यांनी सांगितले.
भजन-कीर्तनासोबत क्रीडेचाही वारसा
अलिबाग परिसराला भजन आणि कीर्तनाची समृद्ध परंपरा लाभली आहे. त्याचबरोबर या भागाला खेळाचाही मोठा वारसा आहे. ग्रामीण भागातील मुलांमध्ये मोठी क्रीडाक्षमता असून त्यांना योग्य प्रशिक्षण व सुविधा उपलब्ध करून दिल्यास ते राज्य, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकू शकतात, असे तटकरे यांनी सांगितले.
वाडगाव येथे उभारण्यात आलेल्या कुस्ती प्रशिक्षण केंद्रातून भविष्यात उत्तमोत्तम कुस्तीपटू घडावेत आणि त्यांनी रायगडचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल करावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
यानंतर खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी दोन मल्लांमध्ये प्रदर्शनीय कुस्तीचा सामना रंगला. या सामन्याला उपस्थित ग्रामस्थ व क्रीडाप्रेमींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कार्यक्रमाला जिल्हा परिषद उपाध्यक्ष मधुकर पाटील, चारुहास मगर, प्रतोद अमित नाईक, सरचिटणीस प्रवीण ठाकूर, उपसरपंच जयेंद्र भगत यांच्यासह ग्रामस्थ, कुस्तीप्रेमी आणि प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.