कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; विविध कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींची उपस्थिती
अलिबाग (प्रतिनिधी) : राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड (RCF), थळ येथे भगवान बिरसा मुंडा जयंती व जनजातीय गौरव दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला कंपनीतील अधिकारी व कर्मचाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. विशेष म्हणजे, कंपनीतील सर्व युनियनचे पदाधिकारी व प्रतिनिधी, ऑफिसर्स असोसिएशनचे प्रतिनिधी, SC/ST असोसिएशन, OBC असोसिएशन तसेच स्थानिक लोकाधिकार समितीचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यानंतर आरसीएफ SC/ST कर्मचारी कल्याण संघटनेच्या प्रतिनिधींनी प्रास्ताविकाद्वारे भगवान बिरसा मुंडा यांचे जीवनकार्य, आदिवासी समाजाचे स्वातंत्र्यलढ्यातील योगदान तसेच आदिवासी संस्कृती आणि परंपरांचे महत्त्व विशद केले.
यानंतर कार्यकारी संचालक (थळ) श्री. नितीन हिर्डे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. आपल्या मार्गदर्शनपर भाषणात त्यांनी भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास, स्वातंत्र्य मिळविण्यासाठी अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी केलेला त्याग आणि दिलेले बलिदान याविषयी विचार मांडले. तसेच स्वातंत्र्याचे महत्त्व जाणून घेत देशाच्या प्रगतीसाठी प्रत्येकाने आपले योगदान देण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाच्या निमित्ताने भगवान बिरसा मुंडा यांच्या जीवनकार्यावर आधारित लघुपट प्रदर्शित करण्यात आला. या लघुपटातून त्यांच्या संघर्षमय जीवनाचा, ब्रिटिश सत्तेविरुद्ध दिलेल्या लढ्याचा आणि आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी केलेल्या कार्याचा परिचय उपस्थितांना करून देण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते श्री. निलेश चांदोरकर यांनी आपल्या अभ्यासपूर्ण व्याख्यानातून आदिवासी समाजाचा गौरवशाली इतिहास, स्वातंत्र्यलढ्यातील आदिवासी महानायकांचे योगदान, आदिवासी संस्कृती व परंपरा याविषयी सविस्तर माहिती दिली. तसेच वन कायदे, जंगलांचे संरक्षण, वनसंवर्धन आणि आदिवासी समाजाचे वनहक्क याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. जंगल आणि आदिवासी समाज यांचे अतूट नाते स्पष्ट करताना त्यांनी वनसंपत्तीचे जतन आणि पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांच्या मार्गदर्शनाला उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
विविध कर्मचारी संघटना व प्रतिनिधींच्या सहभागामुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले. आदिवासी समाजाच्या शौर्य, त्याग, संस्कृती आणि परंपरांचा गौरव करणारा हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.









