पर्यटकांची वाढती संख्या आणि शहरातील वाहतूक कोंडीला दिलासा; अलिबागच्या सौंदर्यातही पडणार भर
अलिबाग (प्रतिनिधी): पर्यटननगरी अलिबागमध्ये वाढत्या पर्यटकांच्या संख्येमुळे आणि झपाट्याने होत असलेल्या शहरीकरणामुळे वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. विशेषतः शहराच्या प्रवेशद्वारापासून मुख्य चौकांपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असल्याने स्थानिक नागरिकांसह पर्यटकांनाही मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. ही समस्या लक्षात घेऊन अलिबाग नगरपरिषदेने वाहतूक व्यवस्थेला अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. माजी नगराध्यक्ष तथा वीज बांधकाम समिती सभापती प्रशांत नाईक यांच्या पुढाकारातून शहरातील महत्त्वाच्या रस्त्यांचे रुंदीकरण आणि डांबरीकरण हाती घेण्यात आले आहे.
अलिबाग शहराचे मुख्य केंद्र असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील वाहतूक सर्कल परिसर तसेच पुढे आर्यन डेव्हलपर्स परिसरातील रस्त्याचे रुंदीकरण करण्यात येत आहे. शहरातील वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या भागात रस्त्याची उपलब्ध जागा वाढल्याने वाहनांच्या प्रवाहाला अधिक मोकळीक मिळण्यास मदत होणार आहे.
यासोबतच डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते महावीर चौक या महत्त्वाच्या मार्गाच्या डांबरीकरणाचे कामही सुरू करण्यात येत आहे. या कामामुळे रस्त्यावरील खड्ड्यांची समस्या दूर होण्यासोबतच रस्त्याची उंची काही प्रमाणात वाढणार आहे. परिणामी पावसाळ्यात रस्त्यावर पाणी साचण्याच्या समस्येलाही काही प्रमाणात आळा बसण्याची अपेक्षा आहे.
अलिबागमध्ये प्रवेश करतानाच नागरिकांना आणि पर्यटकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. पर्यटन हंगामात ही समस्या अधिक तीव्र होते. त्यामुळे केवळ रस्त्यांची डागडुजी न करता वाहतुकीच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यावर नगरपरिषदेकडून भर दिला जात आहे.
दरम्यान, ठिकाणी असणाऱ्या जोग इन्फ्रास्ट्रक्चर परिसरातील जागेचेही रुंदीकरण प्रस्तावित आहे. या ठिकाणी असलेले सर्कल काढून टाकण्याबाबत पोलिसांनी सूचना दिल्या आहेत. मात्र, याबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नसल्याचे वीज व बांधकाम समिती सभापती प्रशांत नाईक यांनी स्पष्ट केले.
वाढत्या पर्यटनाचा दबाव, नागरिकांची गैरसोय आणि शहरातील वाहतूक व्यवस्थेची गरज लक्षात घेऊन अलिबागच्या मुख्य रस्त्यांचे स्वरूप बदलण्याच्या दिशेने प्रशांत नाईक यांनी पुढाकार घेतला आहे. रस्त्यांचे रुंदीकरण, दर्जेदार डांबरीकरण आणि वाहतुकीतील अडथळे दूर करण्याच्या या प्रयत्नांमुळे अलिबागला अधिक सुटसुटीत, सुंदर आणि पर्यटकांसाठी अनुकूल शहर बनविण्याच्या अपेक्षा व्यक्त होत आहेत.
“अलिबागचा विकास हा केवळ रस्ते रुंदावण्यापुरता मर्यादित नसून प्रत्येक अलिबागकराचा प्रवास सुकर करणे आणि पर्यटकांसाठी शहराचा अनुभव अधिक सुखद बनवणे हा त्यामागील उद्देश आहे. अलिबागची पर्यटननगरी म्हणून ओळख अधिक समृद्ध करताना नागरिकांच्या सुविधांना नेहमीच प्राधान्य देऊ.”
— प्रशांत नाईक, माजी नगराध्यक्ष, तथा वीज व बांधकाम सभापती, अलिबाग नगरपरिषद









