कंपनीच्या मॅनेजमेंटशी चर्चा करून ग्रामस्थांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार – पंडित पाटील
अलिबाग(प्रतिनिधी) : तालुक्यातील वरबटणे येथे रिलायन्स कंपनीकडून होत असलेल्या कथित त्रासाविरोधात ग्रामस्थांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. कंपनीच्या कामकाजामुळे स्थानिक कामगारांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. तसेच कंपनीचे ड्रेनेजचे पाणी शेतीमध्ये सोडले जात असल्याने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याची गंभीर तक्रारही ग्रामस्थांनी केली आहे.
या पार्श्वभूमीवर माजी आमदार पंडित पाटील यांनी वरबटणे येथे सुरू असलेल्या ग्रामस्थांच्या बेमुदत उपोषणस्थळी सदिच्छा भेट देऊन आंदोलकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ग्रामस्थांच्या समस्या आणि तक्रारी जाणून घेतल्या.
ग्रामस्थांनी मांडलेल्या प्रश्नांची दखल घेत पंडित पाटील यांनी रिलायन्स कंपनीच्या व्यवस्थापनाशी चर्चा करून हे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपण प्रयत्न करू, असे आश्वासन दिले. स्थानिक कामगारांना होणारा त्रास, ड्रेनेजच्या पाण्यामुळे शेतीचे होणारे नुकसान आणि ग्रामस्थांच्या इतर समस्यांबाबत कंपनी व्यवस्थापनाशी चर्चा करून योग्य तोडगा काढण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कंपनीच्या कामकाजामुळे स्थानिक नागरिकांना त्रास सहन करावा लागू नये, तसेच शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान होऊ नये, अशी ग्रामस्थांची अपेक्षा आहे. माजी आमदार पंडित पाटील यांनी दिलेल्या आश्वासनानंतर आता कंपनी व्यवस्थापन यावर काय भूमिका घेते आणि ग्रामस्थांच्या मागण्यांवर काय तोडगा निघतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.









